पश्चिम लंडनमधल्या हॉस्लो इथे राहणाऱ्या भारतीय-ब्रिटिश कृष अरोराने जगाला आश्चर्यचकित केलं आहे. त्याचं वय फक्त 10 वर्षं असलं, तरी त्याचा मेंदू आइन्स्टाइन आणि हॉकिंग्ज या अत्यंत बुद्धिमान व्यक्तींपेक्षाही तल्लख आहे. भारतीय वंशाच्या कृष अरोराच्या 162 या आयक्यू स्कोअरला मान्यता मिळाली आहे. ग्रेड 7 प्रमाणपत्रासह तो उत्तम पियानोवादक आणि बुद्धिबळपटू आहे. यूकेच्या आउटलेट मेट्रोतल्या वृत्तानुसार, या स्कोअरमुळे कृषचा जगातल्या सर्वांत बुद्धिमान व्यक्तींपैकी अव्वल एक टक्का व्यक्तींमध्ये समावेश होतो.
advertisement
कृषला केवळ अभ्यासाची नाही, तर संगीताचीदेखील आवड आहे. त्याने पियानोवादनात अनेक बक्षिसं मिळवलेली आहेत. त्याच्याकडे ग्रेड 7 पियानो प्रमाणपत्र आहे. कृषने पश्चिम लंडनमधल्या अनेक संगीत स्पर्धांमध्ये दमदार परफॉर्मन्स दिला आहे. तो नेहमी त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्पर्धकांसोबत स्पर्धेत उतरतो आणि त्यात कृषचा परफॉर्मन्स अव्वल ठरतो.
भारतीय वंशाचा कृष अरोरा मेन्सा इथे शिक्षण घेत आहे. या संस्थेत सर्वात हुशार विद्यार्थी शिक्षण घेतात. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कृषने सांगितलं, की '11 प्लसच्या परीक्षा खूप सोप्या होत्या. इथं मला माझ्या गुणवत्तेनुसार आव्हान मिळेल, अशी अपेक्षा आहे.' त्याचे आई-वडील (मौली- निश्चल) दोघंही इंजिनीअर आहेत. कृष 4 वर्षांचा असताना त्याची क्षमता लक्षात आल्याचं ते म्हणाले.
आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या कृषच्या आईने सांगितलं, की वयाच्या चौथ्या वर्षी तो ज्या पद्धतीनं काम करत होता, ते त्याच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत खूप जास्त होतं. तो उत्तमरीत्या अभ्यास करायचा. त्याला शुद्धलेखनाबाबत कोणतीही अडचण नव्हती. त्याला गणित हा विषय विशेष आवडतो आणि तो त्या विषयात अव्वल होता. मला आठवतं, की कृष चार वर्षांचा होण्यापूर्वी त्याने माझ्या जवळ बसून तीन तासांत गणिताचं सगळं पुस्तक वाचून काढलं होतं. 8 वर्षांचा होईपर्यंत त्याने वर्षभराचा अभ्यासक्रम एका दिवसात अभ्यासला होता.
