रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार इराकी हवाई हद्दीमधून अनेक ड्रोन इस्रायलच्या दिशेनं उड्डाण करताना दिसल्याचा दावा इराकमधील सुरक्षा सूत्रांकडून करण्यात आला आहे. एक एप्रिल रोजी दमास्कस येथील इराणच्या वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये दोन वरिष्ठ कमांडरसह सात अधिकारी मारले गेले होते. या हल्ल्यासाठी इराणने इस्रायलला जबााबदार धरले आहे. मात्र इस्रायलकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. इस्रायलने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली किंवा नाकारली नाही.
advertisement
मिळत असलेल्या माहितीनुसार व्हाइट हाऊसने म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो. बायडन यांनी या हल्ल्याचा विरोध केला आहे. या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी शुक्रवारीच इराणला इशारा दिला होता. तसेच जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही इस्रायलसोबत असू असं त्यांनी म्हटलं आहे. इस्रायलच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलच्या दिशेनं जे ड्रोन डागले आहेत त्यांचं वजन प्रत्येकी 20 किलोग्राम इतकं आहे, तसेच त्याच्यामध्ये स्फोटकांचा मोठा साठा आहे.