इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्धाची ठिणगी पडल्यानंतर इजिप्त आणि कतारकडून हे युद्ध थांबवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्ही देशांना इस्त्रायल आणि हमासमध्ये एकमत घडवून आणता आलं नव्हतं. आता अखेर इजिप्त आणि कतारच्या प्रयत्नांना यश आलं आहे. दोन्ही देशांनी मागील अनेक महिन्यांपासून विविध चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर अखेर युद्धबंदीवर दोन्ही बाजुने एकमत झाल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या काही दिवस आधी ही युद्धबंदी झाली आहे, त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासनाचे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
गाझा आणि इस्रायलमधील युद्धबंदी करार अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर इस्त्रायल मध्ये मोठं आंदोलन बघायला मिळालं. हातात मोठे बॅनर, पोस्टर्स आणि इस्रायली झेंडे घेऊन संतप्त निदर्शकांनी इस्रायलची राजधानी जेरुसलेमच्या रस्त्यांवर मोठा मोर्चा काढला. लोकांनी हमासला सैतान म्हटलं. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी तडजोड करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली. दुसरीकडे, इस्रायलमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर तेल अवीवमध्ये ओलिसांच्या कुटुंबियांनी एकत्र येऊन सरकारला युद्धबंदीवर शिक्कामोर्तब करण्याचं आवाहन केलं.
युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यात, आजारी आणि जखमी ओलिसांसह 33 मुले, महिला आणि वृद्धांना सोडण्यात येईल. या सुटकेच्या बदल्यात इस्त्रायल शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांनाही परत पाठवणार आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायल आणि हमासमधील युद्धाला तोंड फुटलं. ज्यामध्ये सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि सुमारे २५० लोकांना ओलीस ठेवले गेले. यानंतर, इस्रायली सुरक्षा दलांनी गाझामध्ये हल्ले सुरू केले आणि हमासचा अंत होईपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याची घोषणा केली. गाझा आरोग्य मंत्रालयाचा दाव्यानुसार, 'ऑक्टोबर २०२३ पासून गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४६,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे.
