इराणचा इस्रायल-अमेरिकेला दणका...
अमेरिका आणि इस्रायलचा असा अंदाज होता की, खामेनींच्या मृत्यूनंतर इराणची यंत्रणा कोलमडेल. पण प्रत्यक्षात इराणने कडवी झुंज देणे सुरू ठेवले आहे. इस्रायल-अमेरिकेच्या तीव्र हल्ल्यानंतरही इराणने आपल्याकडे क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा बराच साठा शिल्लक असल्याचे म्हटले. आम्ही १० वर्ष अमेरिकेसोबत युद्ध करू शकतो असे वक्तव्य इराणने केले आहे. इराणकडून इस्रायल आणि आखातातील अमेरिकन तळांवर भीषण हल्ले सुरूच आहेत. या युद्धामुळे जगात इंधन संकट ओढवले असून खुद्द इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. यामुळेच आता नेत्यान्याहू बचावात्मक पवित्र्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
नेत्यान्याहूंची इराणी जनतेला भावनिक साद...
नेत्यान्याहू यांनी इराणच्या नागरिकांना भावनिक साद घालत विद्रोह करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "ही तुमच्यासाठी आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे. खामेनींची राजवट उलथवून टाका आणि आपले स्वातंत्र्य मिळवा." नेत्यान्याहू यांनी दावा केला की, इस्रायलचे युद्ध इराणच्या जनतेशी नसून तिथल्या हुकूमशहाशी आहे.
नेत्यान्याहूंच्या 'माईंड गेम'चा अर्थ काय?
राजकीय विश्लेषकांच्या मते, नेत्यान्याहू आता इराणमध्ये 'बंडाळी' घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तापालटाचे आवाहन करताना इराणी जनतेने स्वतःच्या भविष्याचा निर्णय स्वतः घ्यावा, असा संकेत त्यांनी दिला. "आम्ही तुमचे शत्रू नसून तुमचे संस्कृती आणि वारशाचा सन्मान करतो," असे म्हणत त्यांनी इराणी लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. आयआरजीसी (IRGC) चे हजारो सैनिक आणि मिसाईल लॉन्चर्स नष्ट केल्याचा दावा करत त्यांनी इराणचे प्रशासन आता कमकुवत झाल्याचे सांगितले.
