३१ मजली इमारतींना वेढा
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग स्थानिक वेळेनुसार दुपारी लागली. आज काही मिनिटांत ३१ मजली टॉवरच्या अनेक मजल्यांवर वेगानं पसरली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉँगकाँगच्या अग्निशमन सेवा विभागाने या घटनेला लेव्हल-५ अलार्म फायर म्हणून घोषित केले, जी हॉँगकाँगमधील आगीची सर्वात गंभीर श्रेणी आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
एक कर्तव्यनिष्ठ जवान शहीद
या भीषण दुर्घटनेत आगीच्या लपेटांमध्ये अडकून आतापर्यंत ४४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सुमारे ३०० लोक बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अत्यंत दुःखद बाब म्हणजे, मृत्यू झालेल्यांमध्ये ३७ वर्षीय एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या जवानाला बहादूर आणि कर्तव्यनिष्ठ असे संबोधत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. बचावकार्य अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे.
७०० हून अधिक जवान बचावकार्यात
घटनास्थळी ७०० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान अविरत आग विझवण्याचे आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. अनेक ठिकाणी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर करून उंच मजल्यांवर पाण्याचा मारा केला जात आहे. लाईव्ह फुटेजमधून दिसत आहे की, भीषण आग आणि दाट धुरामुळे बचावकार्य खूप कठीण झाले आहे. या जीवघेण्या परिस्थितीतही मदतनीस स्वतःचा जीव धोक्यात घालून इमारतींमध्ये प्रवेश करत आहेत. संकटात अडकलेल्या लोकांसाठी हाच आशेचा किरण आहे.
आत अडकलेल्या लोकांची वाढली चिंता
हाँगकाँग सरकार आणि अग्निशमन सेवा विभागाने भीती व्यक्त केली आहे की, अजूनही काही लोक इमारतींच्या आत अडकलेले असू शकतात. मात्र, त्यांची नेमकी संख्या किती आहे, हे लगेच सांगणे शक्य नाही. बचाव दलासमोर दाट धूर, इमारतींची प्रचंड उंची आणि अरुंद जिन्यांचे आव्हान उभे आहे. इमारती आगीचा गोळा बनल्या असताना, आतून किंकाळण्याचे आवाज येत होते आणि जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत होते. या भीषण परिस्थितीतून लोक लवकर सुरक्षित बाहेर पडावेत, यासाठी आता प्रार्थना सुरू आहे.
