मिलिट्री ऑपरेशन्स कमांडने टेलिग्रामवर लिहिलं की, तानाशाह बशर अल असद यांच्यापासून आता दमिश्क शहर स्वतंत्र झालं. जगभरात स्थलांतरीत झालेल्या लोकांची आता स्वतंत्र सीरिया वाट बघत आहे. याआधी विद्रोहींनी राजधानीत घुसल्याचा आणि दमिश्कच्या उत्तरेला असलेलं कुख्यात सैदनाया या तुरुंगावर ताबा मिळवल्याचा दावा केला होता. तर दुसऱ्या बाजूला सीरियाचे पंतप्रधान मोहम्मद गाजी अल जलाली यांनी एका रेकॉर्डेड संदेशात म्हटलं की, सरकार लोकांकडून निवडण्यात आलेल्या कोणत्याही नेतृत्वाला सहकार्य करण्यास तयार आहे. आम्ही सत्ता सोपवण्यासाठीही तयार असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
advertisement
पंतप्रधान मोहम्मद गाजी अल जलाली यांनी म्हटलं की, आम्ही लोकांकडून निवडण्यात आलेल्या कोणत्याही नेतृत्वासोबत काम करण्यास तयार आहोत. सरकार काम नीट होण्यासाठी आणि योग्य बदल ठरवण्यासाठी, राज्याच्या सुविधा कायम ठेवण्यासाठी आवश्यक ती मदत करू.
सीरियातील लोकांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये असं आवाहनही पंतप्रधान गाजी अल जलाली यांनी केलं. सर्व नागरिकांची ही मालमत्ता आहे. मी माझ्या घरात आहे, दुसरीकडे गेलो नाहीय. तसंच हे सोडण्याची इच्छाही नाहीय. शांततेत सार्वजनिक संस्थान, राज्यातील कामकाज चालावं आणि सर्व नागरिकांची सुरक्षा कायम रहावी यासाठी आम्ही आहोत असंही पंतप्रधान म्हणाले.
आता पुढे काय?
बशर-अल-असद यांच्या राजीनंतर सीरिया आता बंडखोरांच्या ताब्यात आहे. अशा स्थितीत बंडखोरच सरकार चालवतील की पंतप्रधान अल-जलाली हा चेहराच राहतील. याचे कारण म्हणजे खुद्द पंतप्रधानच शरणागती पत्करताना दिसत आहेत. लष्करही आता लढण्याच्या मूडमध्ये नाही. दुसरा पर्याय म्हणजे हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) प्रमुख अबू मोहम्मद अल-जुलानी कमांड सांभाळतील आणि सरकार चालवतील. अबू मोहम्मद अल जुलानी हा तोच व्यक्ती आहे ज्याने असाद यांना पदच्युत केले. त्यांच्या नेतृत्वाखालीच बंडखोरांनी सीरियावर ताबा मिळवला आहे. असदच्या पलायनानंतर अबू जुलानी आता सीरियाचा सर्वात शक्तिशाली नेता बनला आहे.
२४ वर्षांच्या राजवटीचा अंत
खरंतर, बशर अल-असद हे गेल्या 24 वर्षांपासून सीरियावर राज्य करत होते. सीरियात त्यांना वारसाहक्काने सत्ता मिळाली आहे. त्याचे वडील अल-असद हाफेझ यांनी 29 वर्षे सीरियावर राज्य केले. रशिया आणि इतर देशांच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार चालत होते. पण यावेळी त्यांचे सरकार अबू जुलानीच्या झंझावाताने उडून गेले. बशर अल-असद 2000 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले. बशर अल-असाद यांचा जन्म 11 सप्टेंबर 1965 रोजी दमास्कस येथे झाला.