कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावरून अमेरिकेने मंगळवारी रात्री उशिरा मिनटमॅन III या डूम्सडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा २० पटीने अधिक शक्तिशाली अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे, यावरुन हे क्षेपणास्त्र किती भयानक आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील वैंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून रात्री ११ च्या सुमारास हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. हे क्षेपणास्त्र निहत्थे (अण्वस्त्राशिवाय) होते, परंतु त्याने प्रशांत महासागरातील मार्शल बेटांजवळील आपले लक्ष्य अचूक गाठले. 'मिसाइल सिस्टीमची अचूकता आणि सज्जता तपासण्यासाठी' ही चाचणी करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
advertisement
मिडिल ईस्टमध्ये युद्धाचा भडका
ही चाचणी अशा वेळी झाली आहे, जेव्हा संपूर्ण मिडिल ईस्ट युद्धाच्या आगीत होरपळत आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे इराण खवळला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत तंबी दिली असून, भविष्यात आणखी मोठे हल्ले करण्याची धमकी दिली आहे. लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये इस्रायलने हल्ल्यांचा धडाका लावला असून हिजबुल्लाहला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
नेमकं काय आहे हे मिनटमॅन III?
हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या संरक्षणातील सर्वात जुनं पण सर्वात विश्वासार्ह शस्त्र मानलं जातं. हे जमिनीवरून लाँच केले जाते आणि १३,००० किलोमीटर दूर असलेल्या शत्रूचा खातमा करू शकते. याला 'मिनटमॅन' का म्हणतात? कारण हे क्षेपणास्त्र अवघ्या एका मिनिटात लाँच करण्यासाठी सज्ज होऊ शकते. अमेरिका आपल्या अण्वस्त्र 'ट्रायंगल' (जमीन, समुद्र आणि हवा) चा भाग म्हणून अशा ४०० क्षेपणास्त्रांचा वापर करते. रशिया आणि चीनसारख्या देशांना रोखण्यासाठी हे एक प्रमुख शस्त्र आहे.
अमेरिकेने ही चाचणी नियमित असल्याचे म्हटले असले तरी, ज्या वेळेत ही चाचणी झाली आहे, त्यामुळे इराण आणि रशियासारख्या देशांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमेरिकेला केवळ हेच दाखवायचे आहे की, जर त्यांच्यावर कोणी अणुहल्ला करण्याचा विचार केला, तर प्रतिहल्ला करण्यासाठी ते एका मिनिटात सज्ज आहेत.
