भारताने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिलेल्या या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले. यात १९९९ मधील IC-814 विमान अपहरण प्रकरणातील प्रमुख आरोपी युसुफ अझहर, अब्दुल मलिक रऊफ आणि मुझस्सिर अहमद यांचाही समावेश होता.
या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. जम्मू काश्मीर, श्रीनगर, पंजाब, राजस्थान, गुजरात या भागातील सीमालगत भागात हल्ला केला. जम्मू यानंतर भारताने अधिक कठोर भूमिका घेत पाकिस्तानमधील आठ हवाई तळ, एअर डिफेन्स सिस्टिम्स, रडार केंद्रं आणि इतर लष्करी ठिकाणांवर जोरदार प्रतिहल्ला केला. पाकिस्तानच्या अधिकृत माहितीनुसार, या चकमकींमध्ये त्यांचे ६ लष्करी जवान आणि ५ हवाई दलाचे सैनिक मारले गेले, तर ७८ जण जखमी झाले आहेत.
advertisement
मारल्या गेलेल्या सैनिकांमध्ये नाईक अब्दुल रहमान, लान्स नाईक दिलावर खान, लान्स नाईक इकरामुल्ला, नाईक वकार खालिद, सिपाही मुहम्मद अदील अकबर, सिपाही निसार (लष्कर) तसेच स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, चीफ टेक्निशियन औरंगझेब, सीनियर टेक्निशियन नजीब, कॉर्पोरल टेक्निशियन फारूक आणि सीनियर टेक्निशियन मुबाशीर (हवाई दल) यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारताने या प्रत्युत्तरात्मक कारवाईत ३५ ते ४० पाकिस्तानी सैनिक आणि १०० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. मारल्या गेलेल्यांमध्ये उच्च मूल्याचे दहशतवादी (High-Value Targets) देखील होते, असे भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे जम्मू विभागातील पूंछ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, काही भागांमध्ये मंदिर, गुरुद्वारा आणि शाळांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे अनेक नागरिकांना रातोरात आपले घर सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. भारताने असा गंभीर आरोपही केला आहे की पाकिस्तानचे काही वरिष्ठ लष्करी आणि नागरी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते, ज्यामुळे पाकिस्तान लष्कराचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध स्पष्ट होतो.
