8 तास चाललेल्या संघर्षात पाकिस्तानचे मोठे नुकसान
आठ तासांच्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडले गेले. या चकमकीत 30 हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तर अनेक जखमी झाले आहेत. पाकिस्तानला या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जीवितहानी सहन करावी लागली. या हल्ल्यानंतर आतापर्यंत 104 प्रवाशांचा जीव सुखरुप वाचवण्यात आल्याची माहिती पाकिस्तान आर्मीकडून देण्यात आली आहे. अद्याप काही प्रवासी दहशतवाद्यांच्या तावडीत आहेत. पाकिस्तान आर्मी आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून आतापर्यंत 16 बलूच दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.
advertisement
BLA चा पाकिस्तानला 48 तासांचा अल्टिमेटम!
BLA ने पाकिस्तान सरकारला ठणकावून सांगितले आहे की, जर 48 तासांत बलूच कैद्यांना सोडले नाही, तर ओलीस ठेवलेले सर्व 214 प्रवासी ठार मारले जातील आणि संपूर्ण ट्रेन नष्ट केली जाईल.
BLA च्या मागण्या:
पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये असलेल्या सर्व बलूच राजकीय कैद्यांची त्वरित सुटका करावी.
जबरदस्तीने गायब केलेल्या बलूच नागरिकांचा शोध लावून त्यांची सुटका करावी.
बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य व सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती पूर्णपणे संपुष्टात आणावी.
BLA ने स्पष्ट इशारा दिला आहे की ही त्यांची अंतिम आणि बदल न करता येणारी मागणी आहे.
हल्ला कसा घडवला गेला?
मश्कफ, धादर आणि बोलन भागात हे संपूर्ण ऑपरेशन सुनियोजित पद्धतीने राबवले गेले. BLA च्या सैनिकांनी रेल्वे ट्रॅक उडवून जफर एक्सप्रेसला अडवले, त्यानंतर तात्काळ संपूर्ण ट्रेनचा ताबा घेतला आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. BLA च्या मजीद ब्रिगेड, स्पेशल युनिट फतेह स्क्वॉड आणि STOS या गटांनी हा हल्ला केला. पाकिस्तानने लष्करी कारवाई केल्यास BLA त्याला आक्रमक प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. बलूच लिबरेशन आर्मीची मुख्य मागणी आहे की बलूचिस्तान हा स्वतंत्र देश असावा आणि पाकिस्तानने त्याच्यावर लादलेले नियंत्रण पूर्णतः संपुष्टात यावे. बलूचिस्तानमधील नागरिक पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांचा पूर्णतः विरोध करतात.
BLA च्या मते, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पामुळे बलूचिस्तानचा नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. या प्रकल्पामुळे हजारो बलूच नागरिक बेघर झाले आहेत. यामुळेच BLA गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानवर हल्ले करत आहे. त्यांनी पूर्वी चीनच्या अभियंत्यांवर आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांवरही अनेक वेळा हल्ले केले आहेत. BLA ने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की जर पाकिस्तान लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न करेल, तर ओलीस ठेवलेल्या सर्व प्रवाशांना ठार केले जाईल आणि संपूर्ण ट्रेन नष्ट केली जाईल.
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्कराला खुले आव्हान दिले आहे. ओलीस ठेवलेले 214 नागरिकांच्या जीव धोक्यात आहे. पाकिस्तानकडे आता फक्त 48 तासांचा वेळ आहे. ते बलूच कैद्यांना सोडवतात की सैन्य कारवाई करतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. या हल्ल्यामुळे प्रचंड अस्थिरता वाढली आहे. पाकिस्तान दोन्ही बाजूने अडकलं आहे. त्यामुळे नेमकं कोणतं पाऊल उचलणार ते पाहावं लागणार आहे.
