यावेळी पाकिस्तानी डिप्लोमॅटच्या कृत्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभं राहून भारतीय आंदोलकांकडे पाहून थेट 'सर तन से जुदा'चा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या गळ्यावरून अंगठा फिरवत, गळा कापू अशा प्रकारचा इशारा केला आहे. या कृत्यातून कर्नल तैमूर यांनी भारतीय आंदोलकांना डिवचण्यचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार आंदोलकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
advertisement
या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तैमूर यांच्या हातात यावेळी भारतीय लष्करी अधिकारी अभिनंदन यांचा फोटो असणारं पोस्टरही पाहायला मिळत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाहीये. मात्र हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येनं भारतीय नागरिकांनी हातात निषेधाचे फलक आणि राष्ट्रध्वज घेत विरोधाचा सूर आळवला. अडचणीच्या आणि संघर्षाच्या या प्रसंगी देश म्हणून आम्ही सारे एकत्र आहोत असं ठणकावून सांगताना भारतानं पाकिस्तानची कोंडी केल्याची नारेबाजीसुद्धा या आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि या सर्व वातावरणातच पाकिस्तानी अधिकाऱ्याची ही कृती टीकेची धनी ठरली.
