युद्धभूमीवर तोडगा काढता येत नाही - मोदी
जिथे संघर्षाचा प्रश्न असतो, तिथे भारत तटस्थ देश नाही. आम्ही शांततेच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. हे युद्धाचं युग नाही. आम्हाला युद्ध संपवायचं आहे. युद्धभूमीवर तोडगा काढता येत नाही. आम्ही सर्व शांतता उपक्रमांना पाठिंबा देतो आणि युद्ध संपवण्याच्या ट्रम्पच्या पुढाकारालाही आमचा पाठिंबा आहे", अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी मांडली. यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील मोदींच्या भूमिकेला समर्थन दिलं. "आम्हाला रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवायचं आहे", असं ट्रम्प म्हणाले.
advertisement
खरं तर, ट्रम्प यांनी दोनच दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करून तातडीने युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी सुरू कराव्यात अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर दोनच दिवसांत मोदींनी आपली भूमिका मांडली आहे.
भारतासोबत आम्हाला विक्रमी व्यवसाय करायचाय- ट्रम्प
युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भारताच्या भूमिकेबाबत विचारलं असता ट्रम्प म्हणाले, "आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही सर्व देशांशी चांगले संबंध ठेवणार आहोत. आम्ही खूप चांगले काम करणार आहोत. मला वाटते की आम्ही विक्रमी व्यवसाय करणार आहोत. आम्ही भारतासोबतही काम करणार आहोत. नजीकच्या भविष्यात आम्ही दोन्ही देशांमध्ये अनेक मोठे व्यापार करार जाहीर करणार आहेत."
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारतासह सर्व देशांवर परस्पर आयात शुल्क लागू केला आहे. या घोषणेनंतर काही तासांतच ही बैठक झाली. व्यापाराबाबत भारतावर कठोर कारवाई होत असताना, त्यांचे प्रशासन चीनशी कसे लढणार? असे विचारले असता, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले, आम्हाला कुणाशीही लढायचं नाही, किंवा कुणाला हरवायचं नाही, आम्हाला केवळ काही गोष्टी जिथल्या तिथे बसवायच्या आहेत.
"आम्ही कोणालाही हरवण्यासाठी खूप चांगल्या स्थितीत आहोत. पण आम्ही कोणालाही हरवू इच्छित नाही, आम्ही खरोखर चांगले काम करू इच्छित आहोत. आम्ही अमेरिकन लोकांसाठी खूप चांगले काम केले आहे. आमचे ४ वर्षे खूप चांगले गेले. आता पूर्वीपेक्षा खूप मजबूतपणे काम करणार आहोत," ट्रम्प म्हणाले.
भारत आणि अमेरिका एकत्र येतात तेव्हा 1+1 = 11 बनतो- मोदी
तर पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही राष्ट्रांमध्ये एकता आणि चांगल्या सहकार्याचं आवाहन केलं. यावेळी मोदी म्हणाले, "अमेरिका ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे आणि भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे जेव्हा भारत आणि अमेरिका एकत्र येतात तेव्हा आपण 1+1 = 11 बनतो, 2 नाही. ही 11 ची शक्ती आहे जी मानवतेच्या कल्याणासाठी काम करेल."
