रशियाच्या कजान शहरात 3 हायराइज इमारतींवर सीरियन किलर ड्रोन धडकले. त्यानंतर मोठी आग लागली. या हल्ल्यानंतर मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. रशियाने एक ड्रोनला टार्गेट करून नष्ट केल्याचं सांगितलं आहे.
कजानमधील उंच इमारतींवर ड्रोन हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहेत. वेगवेगळ्या दिशांनी येणारे किलर ड्रोन (यूएव्ही) हवेत इमारतींवर आदळत असल्याचे स्पष्टपणे दिसतंय. इमारतीला ड्रोन आदळल्यानंतर मोठा स्फोटही झाला. या हल्ल्याचा थेट आरोप रशियाने युक्रेनवर केला आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून हा ड्रोन हल्ला युक्रेनने केल्याचे म्हटले आहे.
रशियातून समोर आलेल्या माहितीवरून या इमारतींमध्ये रहिवासी राहत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आणखी एका हल्ल्याच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून जवळपासच्या उंच इमारतीही रिकामी करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रशियातील कझान शहरातील विमानतळावरही उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
