सुनीता विल्यम्स यांचा निवृत्तीचा निर्णय जितका मोठा आहे, तितकाच त्यांचा शेवटचा प्रवासही थरारक ठरला. खरं तर त्या जून २०२४ मध्ये अवघ्या ८ दिवसांच्या मोहिमेवर गेल्या होत्या. पण विमानाचे इंजिन आणि नशिबाचे चक्र असे काही फिरले की, त्यांना अंतराळात तब्बल २८६ दिवस अडकून राहावं लागलं. ज्या वयात लोक आरामाचा विचार करतात, त्या ६० व्या वर्षी सुनीता यांनी अवकाशात जगण्यासाठी वेगळ्या पातळीवर झुंज देत स्वतःला आणि आपल्या टीमला सुखरूप परत आणलं. मार्च २०२५ मध्ये जेव्हा त्या पृथ्वीवर उतरल्या, तेव्हाच या 'स्पेस क्वीन'च्या निवृत्तीचे संकेत मिळाले होते.
advertisement
सुनीता यांच्या नावावर सर्वात जास्त वेळ अंतराळात राहणारी महिला म्हणून रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. त्यांनी ६०८ दिवस अंतराळात काढले. नासाच्या इतिहासात हा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. त्यांनी ९ वेळा यानाला सोडून अंतराळातील शून्यात पाऊल टाकलं. एकूण ६२ तास ६ मिनिटे त्यांनी तिथे काम केलं. महिलांमध्ये हा जागतिक विक्रम आहे. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी भावुक होत म्हटलं, "सुनीता यांनी केवळ मोहिमा फत्ते केल्या नाहीत, तर त्यांनी अंतराळ संशोधनाचं भविष्य लिहिलं आहे. त्या खऱ्या अर्थाने 'ट्रेलब्लेझर' आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणामुळेच येणाऱ्या काळात आपण चंद्रावर देखील राहायला जाण्याचं स्वप्न पाहू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे.
सुनीता म्हणात, निवृत्ती म्हणजे काम थांबवणं नाही. त्या सध्या तरुण पिढीला, विशेषतः मुलींना विज्ञानाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. जरी त्या आता स्पेस सूट घालून यानात बसणार नसल्या, तरी आर्टेमिस सारख्या आगामी मोहिमांमध्ये त्या पडद्यामागून मोठी भूमिका बजावताना दिसतील असं त्यांच्या बोलण्यातून दिसलं आहे. त्यांना पडद्यामागे राहून त्यांच्यासारख्याच तरुणींना घडवायचे उमेद त्यांच्या मनात आहे हे यावेळी स्पष्ट दिसून आलं.
सुनीता विल्यम्स हे एक केवळ नाव नाही तर एक ताकद आहे. त्यांनी जे केलंय ते पाहून त्यांचा आदर्श घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलींना प्रेरणा मिळत आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुली, तरुणी नासा, इस्त्रोमध्ये जाण्याचं स्वप्न पाहात आहेत.
