साहस, आत्मविश्वास आणि टीमवर्कचं उत्तम उदाहरण असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अखेर नासातून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या ६० व्या वर्षी सक्रिय सेवेतून निवृत्त होताना त्यांनी अंतराळ संशोधनाची 'मशाल' आता पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला चंद्रावर जायला आवडेल का? तेव्हा सुनीता विल्यम्स यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तर दिले.
advertisement
सुनिता म्हणाल्या "मला चंद्रावर जायला नक्कीच आवडेल, पण माझे पती मला आता मारतील! आता घरी परतण्याची वेळ आली आहे... आणि पुढच्या पिढीकडे ही जबाबदारी सोपवण्याचीही वेळ आली आहे. अंतराळ संशोधकांच्या नव्या पिढीला आता इतिहास रचण्यासाठी वाव मिळायला हवा."
भारतीय वंशाच्या जगप्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नासामध्ये २७ वर्षांची प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवा देऊन आपल्या कारकिर्दीचा समारोप केला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान प्रवासात त्यांनी अंतराळ संशोधनाचे अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. सुनीता यांनी अंतराळात एकूण ६०८ दिवस व्यतीत केले असून, नासाच्या इतिहासात एकत्रितपणे सर्वाधिक काळ अवकाशात राहणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीत त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावावर केवळ वास्तव्याचेच नव्हे, तर 'स्पेस वॉक'चेही मोठे विक्रम आहेत. त्यांनी तब्बल ९ वेळा अंतराळात मुक्त संचार (स्पेस वॉक) केला असून, एकूण ६२ तास ६ मिनिटे यानाबाहेर राहून काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
सुनीता विल्यम्स यांची शेवटची मोहीम ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक ठरली. मार्च २०२५ मध्ये त्यांनी हा प्रवास फत्ते केला, ज्यामध्ये त्यांनी २८६ दिवस अंतराळात घालवले होते. आता ही जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली असल्याचे सांगत, त्यांनी "आता घर परतण्याची वेळ आली आहे," अशा भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया देताना नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी सुनीता यांचे वर्णन 'ट्रेलब्लेझर' म्हणजेच भविष्यातील संशोधकांना वाट दाखवणारा मार्गदर्शक असे केले आहे.
