अंतराळयानाचे यशस्वी लँडिंग
बुधवारी (भारतीय वेळेनुसार) पहाटे 3:27 वाजता स्पेसएक्स ड्रॅगन यानाने पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश केला आणि नंतर स्प्लॅशडाउनच्या माध्यमातून समुद्रात सुरक्षित उतरले. लँडिंगच्या ठिकाणी आधीच स्पेसएक्सच्या रिकव्हरी टीम्स उपस्थित होत्या. यानाला पाण्याच्या बाहेर काढून ते विशेष रिकव्हरी व्हेईकलमध्ये ठेवण्यात आले.
सुनिता विल्यम्सच्या तब्येतीची त्वरित तपासणी
लँडिंगनंतर सुनिता विल्यम्स आणि अन्य अंतराळवीरांना त्वरित बाहेर आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून आरोग्य चाचण्या सुरू आहेत. अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरातील बदल आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची तपासणी करण्यासाठी त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले जात आहे.
भारताचा अभिमान! पंतप्रधान मोदींचे निमंत्रण
भारतासह संपूर्ण जगभरातील लोक सुनिता विल्यम्सच्या सुरक्षित परताव्याने आनंदित झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत वारंवार अपडेट घेतले आणि भारत भेटीसाठी निमंत्रणही दिले. इस्रोचे माजी प्रमुख एस. सोमनाथ यांनीही हा क्षण भारतासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
स्पेसएक्स आणि नासाची मोठी उपलब्धी
स्पेसएक्स आणि नासासाठी हे मिशन अत्यंत यशस्वी ठरले आहे. नऊ महिन्यांच्या वाटचालीनंतर हा सुखरूप परतावा अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी एक मोठी उपलब्धी मानला जात आहे. भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासाने भारतालाही अभिमान वाटत आहे.
