एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर त्यापासून आपण लांबच राहतो. अंधाराची, किड्यांची, सापाची, एखाद्या वस्तूची वगैरे भीती वाटू शकते; पण फळांची भीती कोणाला वाटत असेल का? स्वीडनच्या लैंगिक समानता मंत्री पॉलिन ब्रँडबर्ग यांना तशी भीती वाटते. त्यांना केळ्यांची भीती वाटते. ती भीती इतकी असते, की त्या जिथे जाणार असतील तिथून आधीच केळी दूर ठेवली जातात. नाही तर केळी पाहून त्या थरथर कापायला लागतात.
advertisement
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, स्वीडनच्या पॉलिना ब्रँडबर्ग सध्या एका विचित्र गोष्टीमुळे लोकप्रिय झाल्या आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी 2020 साली त्यांच्या बनाना फोबियाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट काही दिवसांनी डिलीट करण्यात आली. त्यात त्यांना बनाना फोबिया अर्थात केळ्याची भीती वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
स्वीडनच्या आणखी एक राजकीय नेत्या टेरेसा कार्व्हालो यांनी त्यांनाही असाच बनाना फोबिया असल्याचं त्यांनी ‘एक्स’वर म्हटलं होतं. एक्स्प्रेसन या स्थानिक मीडिया आउटलेटच्या हाती काही लीक झालेले ईमेल्स लागले आहेत. त्यात मंत्री पॉलिना यांनी त्यांच्या अधिकृत दौऱ्यांच्या आधी त्या त्या ठिकाणी केळी ठेवू नयेत असं कर्मचाऱ्यांना सांगितल्याचा उल्लेख आहे. हा फोबिया अतिशय दुर्मीळ आहे. या विचित्र आजारानं ग्रस्त असलेली व्यक्ती जेव्हा केळी पाहते, तेव्हा ती व्यक्ती भीतीनं थरथर कापू लागते. त्या व्यक्तीला काळजी वाटू लागते. जीव घाबरा होतो, गुदमरू लागतं.
मीडिया आउटलेटच्या हाती लागलेला ईमेल व्हीआयपी लंचबाबतचा आहे. त्यात यांनी जेवणामधून केळी बाजूला काढायला सांगितली आहेत. ब्रँडबर्ग यांना केळ्यांची अॅलर्जी आहे. मंत्री पॉलिना यांनीही एक्स्प्रेसनला उत्तर देताना त्यांच्या फोबियाबद्दल सांगितलं आहे. ही एक प्रकारची भीती असून एखाद्या अॅलर्जीसारखा हा आजार आहे. त्याबाबत वैद्यकीय मदत घेतली जात आहे. अशा प्रकारची भीती कोणाच्या मनात कशी बसते याबाबत अजून डॉक्टरांनाही संपूर्ण माहिती नाही; मात्र बालपणातील काही अनुभवांशी याचा संबंध असू शकतो, असा अंदाज आहे.
