‘इराण इंटरनॅशनल’ने एक्स वर दिलेल्या माहितीनुसार परंदमधील एका रहिवाशाने व्हिडिओ शेअर करत स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचा दावा केला आणि त्यानंतर परिसरातून धूर उठताना दिसल्याचे म्हटले. मात्र या व्हिडिओची सत्यता स्वतंत्रपणे पडताळता आलेली नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान इराणी अधिकाऱ्यांनी कोणतीही सुरक्षा-संबंधित घटना घडल्याचा दावा फेटाळून लावला. सरकारी माध्यमांनी परंद अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितले की, नदीकाठी असलेल्या गवताला (रीड्स) लागलेल्या आगीमुळे धूर उठला होता. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
advertisement
रॉयटर्सच्या वृत्तानुसार सरकारी दूरचित्रवाणीवर परंद परिसरावर उठणाऱ्या धुराचे दृश्य दाखवण्यात आले. परंद हे शहर तेहरान प्रांतात असून ते काही लष्करी आणि धोरणात्मक स्थळांच्या जवळ आहे. मात्र लष्करी कारवाईमुळे कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य तणाववाढीबाबत अटकळी वाढत आहेत. ‘ऍक्सिओस’च्या अहवालानुसार जर राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरले तर ट्रम्प प्रशासन तेहरानविरोधात मोठ्या लष्करी कारवाईकडे झुकू शकते, अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
संभाव्य लष्करी कारवाई ही मर्यादित किंवा प्रतीकात्मक हल्ल्याऐवजी काही आठवडे चालणाऱ्या व्यापक मोहिमेच्या स्वरूपात असू शकते. तसेच अमेरिकन आणि इस्रायली संयुक्त कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्याचे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक भू-राजकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
याशिवाय या प्रदेशात अमेरिकेची वाढती लष्करी उपस्थिती ज्यात विमानवाहू नौका, फायटर जेट्स आणि हवाई संरक्षण प्रणालींचा समावेश आहे. यामुळे आण्विक चर्चेत अपयश आल्यास अमेरिकेची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर असू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या अधिकृतरीत्या ही घटना केवळ आगीमुळे झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परंदमधील धुराच्या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना पुन्हा चालना दिली आहे.
