advertisement

Shiv Jayanti 2026 : ...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, कारणही सांगितलं

Last Updated:

इतिहासाचा अभ्यास न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

+
News18

News18

पुणे : शिवजयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी उत्साहात कार्यक्रम आणि व्याख्यानमाला आयोजित केल्या जात असताना, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी पसरलेल्या समज-गैरसमजांवर परखड भाष्य केले. इतिहासाचा अभ्यास न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सुरुवात करताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल जितके बोलले गेले पाहिजे तितके आजही बोलले जात नाही. उलट त्यांच्या सैन्यरचनेपासून ते पराक्रमांपर्यंत अनेक बाबींमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात एक लाख मुस्लिम सैनिक होते, असा दावा काही ठिकाणी केला जातो. मात्र इतिहासातील दप्तरी नोंदी पाहिल्यास असे कोणतेही पुरावे आढळत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
महाराजांच्या सेवेत मुस्लिम समाजातील काही जण होते, हे त्यांनी मान्य केले परंतु त्यांची संख्या एक टक्क्यांच्या आसपास होती, असे ते म्हणाले. महाराजांसोबत असलेल्या 32 अंगरक्षकांमध्ये मुस्लिम समाजातील व्यक्तींचा समावेश होता, मात्र त्याचा विपर्यास करून मोठे दावे केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तुर्कस्तानातून औरंगजेबासोबत आलेले लोक महाराजांच्या सेवेत नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
इतिहासातील आणखी एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे येसाजी कंक यांनी 65 किलो वजनाची तलवार वापरली, हा दावा. महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केल्यास 65 किलो वजनाच्या तलवारीचा उल्लेख कुठेही आढळत नाही. युद्धात इतक्या वजनाची तलवार वापरणे व्यवहार्य नव्हते, असे बांगर यांनी सांगितले. झिर टोप चिलखत, हात-पायांचे संरक्षक कवच आणि तलवार यांचे एकत्रित वजन 80 ते 90 किलोपर्यंत जाऊ शकते मात्र 65 किलो हे येसाजी कंक यांच्या स्वतःच्या वजनाशी संबंधित असल्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीची पडताळणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
advertisement
दिल्लीहून आठ तासांत घोडा आणण्याची कथा आणि संताजी यांचा जन्मकाल याबाबतही त्यांनी उदाहरण दिले. 1649 साली शहाजी राजांना सोडवण्यासाठी पत्र आणण्याची घटना सांगितली जाते मात्र संताजींच्या जन्मवर्षाच्या नोंदी 1645 ते 1660 दरम्यान आढळतात. त्यामुळे त्या कथनातील कालमर्यादा जुळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. इतिहासातील घटनांची वर्षे, संदर्भ आणि दप्तरी पुरावे तपासल्याशिवाय निष्कर्ष काढू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
महाराज आणि त्यांच्या मावळ्यांबाबत अनेक चुकीच्या समजुती आपल्याच लोकांकडून पसरवल्या जात आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे बांगर म्हणाले. शिवचरित्राचा सखोल अभ्यास करणे ही आजची गरज आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही महाराजांवर संशोधन सुरू आहे. नवनवीन संदर्भ आणि पुरावे पुढे येत आहेत. आपण त्याचा अभ्यास करून योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
advertisement
यावेळी त्यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या पद्धतीवरही भाष्य केले. डीजेच्या कर्कश आवाजामुळे होणारा त्रास महाराजांना अपेक्षित नसल्याचे सांगत, मिरवणुका काढण्यापलीकडे जाऊन त्यांच्या नेतृत्वगुणांचा, दातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराजांचे सर्व गुण आत्मसात करणे सर्वांना शक्य नाही मात्र त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्व्यसनी होते. आजच्या तरुणांनी किमान निर्व्यसनी जीवनाचा संकल्प जरी केला, तरी खरी शिवजयंती साजरी होईल, असा संदेश त्यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Jayanti 2026 : ...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, कारणही सांगितलं
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement