दोन्ही देशात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, एका वेगळ्या देशानं या संघर्षात उडी घेतली आहे. ज्यावेळी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला, तेव्हा तुर्कियेनं पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला. यानंतर तुर्कियेचं एक विमान पाकिस्तानात लँड झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान पाकिस्तानात उतरल्यानंतर भारताने यावर आक्षेप घेतला होता. तेव्हा तुर्कियेनं हे विमान अवघ्या काही मिनिटांसाठी पाकिस्तानात उतरलं आहे. आम्ही लगेच विमान परत बोलावत आहोत, असं सांगण्यात आलं होतं.
advertisement
मात्र आता या विमानातून पाकिस्तानला रसद पुरवल्याची माहिती समोर येत आहे. या विमानातून तुर्कियेनं छुप्या पद्धतीने पाकिस्तानला काही ड्रोन्स पुरवले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तूर्तास तुर्कियेकडून पाकिस्तानला अशाप्रकारे मदत केल्याचं कुणीही अधिकृतपणे सांगितलं नाहीये. मात्र भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर तुर्कियेनं पाकिस्तानला समर्थन दर्शवलं होतं. अशात संदिग्ध विमान पाकिस्तानात उतरल्याने भारतासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत-पाक संघर्षावर तुर्कियेची भूमिका काय?
तुर्किये राजदूतांनी नुकतंच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पाकिस्तानला समर्थन दिलं. तुर्कीच्या राजदूताने भारताने दहशतवाद्यांवर केलेला हल्ला पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानलं आणि निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तुर्कीने म्हटले आहे की, काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांचं मतप्रवाह लक्षात घेऊन सोडवला पाहिजे.
