अमेरिकेतील वृत्तसंस्था 'वॉशिंग्टन पोस्ट' इराण युद्धाबाबत मोठा दावा करणारे वृत्त दिले आहे. ट्रम्प यांचे कान भरून इराणचा गेम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर लष्करी हल्ला करण्यासाठी वारंवार प्रवृत्त केल्याचे वृत्त 'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिले आहे.
पडद्यामागे 'MBS'चे मोठे गेमप्लॅन
advertisement
अहवालानुसार, मोहम्मद बिन सलमान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक गुप्त फोन कॉल्स केले होते. एकीकडे सौदी अरेबिया इराणसोबतचे संबंध सुधारल्याचे जगाला दाखवत होता, मात्र दुसरीकडे क्राउन प्रिन्स एमबीएस हे तेहरानवर बॉम्बहल्ला करण्यासाठी अमेरिकेवर दबाव टाकत होते. ट्रम्प यांना या वादावर राजनैतिक तोडगा हवा होता, परंतु सलमान यांनी लष्करी कारवाईचाच आग्रह धरला होता.
इराणला रोखण्यासाठी इस्रायल आणि सौदी एकवटले?
केवळ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूच नव्हे, तर सौदी अरेबियानेही इराणला संपवण्यासाठी अमेरिकेला चिथावणी दिली. एमबीएस यांनी ट्रम्प यांना खात्री दिली होती की, जर अमेरिकेने हल्ला केला आणि इराणने प्रत्युत्तर दिले, तर सौदी अरेबिया तेल पुरवठा खंडित होऊ देणार नाही आणि प्रादेशिक सुरक्षा राखण्यासाठी पूर्ण मदत करेल. "जर आता हल्ला केला नाही, तर इराण अधिक शक्तिशाली होईल," असा इशाराही सलमान यांनी ट्रम्प यांना दिला होता.
जावई जेरेड कुशनर यांच्याशी असलेल्या मैत्रीचा वापर
सौदी प्रिन्सने आपला अजेंडा राबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांचा पुरेपूर वापर केला. चीनच्या मध्यस्थीमुळे इराण आणि सौदीमधील संबंध सुधारले असल्याचे चित्र असताना, पडद्यामागे मात्र सौदीने इस्रायलच्या सुरात सूर मिसळत इराणविरुद्ध मोर्चेबांधणी केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
