ही घटना रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव रौनक द्विवेदी असून तो आपल्या मित्रासोबत स्कूटीवरून श्रीराम चौकाच्या दिशेने जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री मित्रासोबत घरी जात असताना रस्त्यात अचानक एक कुत्रा आला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रौनकने स्कूटी वळवली, मात्र त्याचा वेग जास्त असल्यामुळे स्कूटीवरील नियंत्रण सुटून ती थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन पडली.
advertisement
या भीषण अपघातात रौनकच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र स्कूटीवरून उडून नाल्याच्या कडेला पडला आणि त्याला किरकोळ जखमा झाल्या.
ही संपूर्ण घटना जवळील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात पोहोचवलं, मात्र डॉक्टरांनी रौनकला मृत घोषित केलं.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दुर्ग पोलीस प्रवक्ता पद्म श्री तंवर यांनी सांगितले की, स्कूटीचा वेग खूप जास्त होता आणि अचानक आलेल्या अडथळ्यामुळे ती नाल्यात कोसळली. रौनकच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे, आणि सोशल मीडियावर लोक या घटनेविषयी हळहळ व्यक्त करत आहेत. ही घटना छत्तीसगडमधील भिलाई भागातील सुपेला जवळ घडली.