छत्रपती संभाजीनगर: संकटात एखाद्याच्या मदतीला धावून जाणं हे पोलीस बांधवांचं कर्तव्य असतं आणि ते नेहमीच पार पाडत असतात. बऱ्याचदा अगदी जीवावर उदार होऊन देखील ते अनेकांचे प्राण वाचवत असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पोलीस भाजीविक्रेत्यासाठी देवदूत ठरला आहे. साताऱ्यात एका भाजीविक्रेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेव्हा पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे यांनी डॉक्टरच्या भूमिकेत जावून त्यांना जीवदान दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून गव्हाणे यांनी प्रसंगावधान दाखवल्याबद्दल त्यांचं कौतुक होतंय.
advertisement
पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे हे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत आहेत. घरातून कर्तव्यावर जात असताना दुपारी 1.35 च्या सुमारास वाटेतच एका भाजीविक्रेत्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे त्यांच्या लक्षात आले. रामकिसन श्रीधरराव सुलक्षणे हे हृदयविकारामुळे दुकानातच जमिनीवर कोसळले होते. तसेच ते बेशुध्दावस्थेत गेले होते. यावेळी अंमलदार रामदास गव्हाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान राखून रामकिसन यांना तत्काळ सीपीआर देण्यात सुरुवात केली.
महाराष्ट्रात इथं खेळली जाते रक्ताची धुळवड, दगडाने फोडतात एकमेकांची डोकी, अशी कशी परंपरा?
वेळेत सीपीआर दिल्याने भाजीविक्रेते रामकिसन यांचे प्राण वाचले. त्यानंतर त्यांना तातडीने सिग्मा हॉस्पिटल येथे बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मृत्यूच्या दाढेत गेलेल्या रामकिसन यांचे प्राण वाचू शकले आहेत.
व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच सामाजिक भान राखत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या रामदास गव्हाणे या अंमलदाराचं सर्व स्तरातून खूप कौतुक होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गव्हाणे यांना बोलवून त्यांचा सत्कार देखील केला.
प्रशिक्षण आलं कामी
काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तालयात पोलीस अंमलदार व अधिकाऱ्यांना डॉक्टर व तज्ज्ञांकडून प्राण वाचवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले होते. यात सीपीआर कसा द्यावा, तोंटावाटे श्वास कसा पुरवावा, याचे प्रशिक्षणही दिले होते. हेच प्रशिक्षण कामी आल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.





