तो चहा वाला एका मोठ्या चहा कंपनीचा मालक आहे. जो देशाच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत येतो.
हे दोघेही चीनमधील उच्चभ्रू आणि श्रीमंत कुटुंबातून येतात, त्यामुळे त्यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बातमीनंतर हे अब्जाधीश कोण आहेत, ते काय करतात? हे सर्व जाणून घेण्यासाठी लोक उत्सुकत आहेत.
ही गोष्ट आहे चीनच्या टॉप श्रीमंतांमध्ये गणल्या जाणाऱ्या Gao Haichun आणि Zhang Junjie यांची. त्यांची भेट एका व्यावसायिक कार्यक्रमात झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, दोघेही 30 वर्षांचे आहेत आणि त्यांनी आता लग्न करत असल्याची बातमी दिली.
advertisement
ट्रिना सोलर कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ते दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत, तरी लग्नाच्या तारखांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, या बातमीनंतर सोशल मीडियावर त्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहेत Gao Haichun?
Gao Haichun, ज्यांना Katherine Haichun Gao या नावानेही ओळखले जाते, त्या ट्रिना सोलर कंपनीचे संस्थापक Gao Jifan यांच्या कन्या आहेत. म्हणजेच, त्यांना अब्जावधींची संपत्ती वारसाहक्काने मिळणार आहे.
शिक्षण आणि करिअर: त्यांनी ब्राउन विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या वडिलांच्या ट्रिना सोलर कंपनी लिमिटेडच्या बोर्डाच्या सह-अध्यक्ष आहेत. या कंपनीत रुजू होण्यापूर्वी त्यांनी काही काळ मॅकिन्से अँड कंपनीमध्येही काम केले होते.
जागतिक ओळख: 2025 मध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने त्यांना 'युवा जागतिक नेता' म्हणून गौरवणार आहे.
ट्रिना सोलर कंपनी: चांगझोऊ येथे स्थित सौर पॅनेल बनवणारी ही दिग्गज कंपनी 1997 मध्ये स्थापन झाली. आज तिचे बाजारमूल्य 43 अब्ज युआन (सुमारे 6.3 अब्ज डॉलर) आहे. अनेक अहवालानुसार, Gao Haichun यांची एकूण संपत्ती सुमारे 26 हजार कोटी रुपये असल्याची शक्यता आहे.
कोण आहेत Zhang Junjie?
Zhang Junjie हे न्यूयॉर्कमध्ये सूचीबद्ध असलेल्या Chagee या प्रीमियम चहा ब्रँडचे मालक आहेत. एप्रिलमध्ये त्यांची कंपनी न्यूयॉर्क शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर ते अब्जाधीश बनले. त्यांनी 2017 मध्ये हा प्रीमियम चहा ब्रँड सुरू केला. सध्या ते कंपनीचे सीईओ आणि चेअरमन आहेत.
यापूर्वी त्यांनी शंघाई म्युये रोबोटिक्स कंपनीमध्ये काम केले होते. दक्षिण-पश्चिम चीनच्या युन्नान प्रांतात त्यांनी आपल्या कंपनीची सुरुवात केली. त्यांच्या कंपनीचे नाव चीनी शोकांतिका "फेअरवेल माय कॉन्क्यूबाइन" (Farewell My Concubine) वरून प्रेरित आहे.
आज त्यांच्या कंपनीची देशभरात 7000 हून अधिक दुकाने आहेत. अनेक अहवालानुसार, Zhang Junjie यांची संपत्ती सुमारे 17 हजार कोटी रुपये असल्याचे मानले जाते.
