वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांची पात्रता तपासली जाते. त्याचप्रमाणे उमेदवाराची उंचीही लक्षात घेतली जाते. याचा फटका तीन फूट उंचीच्या गणेश बरैया यांना बसला. डॉक्टर होण्यासाठी त्यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला. एमबीबीएस पदवीसाठी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता, मात्र त्यांनी न्यायालयात त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूनं निकाल दिला. त्यामुळे गुजरातच्या सरकारी रुग्णालयात आज त्यांची नियुक्ती झाली असून, ते जगातले सगळ्यात कमी उंचीचे डॉक्टर झाले आहेत.
advertisement
‘माझी उंची फक्त तीन फूट असल्यामुळे मी इमर्जन्सी केसेस हाताळू शकणार नाही,’ असं कारण देत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने माझा प्रवेश नाकारला होता,’ असं डॉ. गणेश बरैया सांगतात. त्यांच्याबरोबर अन्य दोन विद्यार्थिनींनाही त्यांच्या व्यंगामुळे प्रवेश टाळण्यात आला होता. त्यामुळे भावनगरच्या कलेक्टरांच्या मार्गदर्शनानुसार त्या तिन्ही विद्यार्थ्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन महिन्यानंतर ते केस हरले, मात्र 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांनी न्याय मागितला. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार 2019 मध्ये गणेश यांनी भावनगरमधील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला.
ते म्हणाले, ‘माझ्याबरोबर आणखी दोन विद्यार्थी होते आम्ही तिघांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती, मात्र आम्ही केस हरल्यामुळे मी निराश झालो. नंतर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.’ डॉ. गणेश यांनी भावनगरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ते सध्या 23 वर्षांचे आहेत. त्यांच्या वडिलांनी सांगितलं, की लहानपणी गणेश यांचं डोकं मोठं होऊ लागलं होतं, पण उंची वाढत नव्हती. कुटुंबियांनी अनेक नवससायास केले, पण त्यांची उंची वाढली नाही. एकदा गणेश यांना एक लाख रुपयांच्या बदल्यात सर्कशीत येण्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. यामुळे आई-वडिलांना खूप दुःख झालं. कोणी त्याला पळवून नेऊ नये, यासाठी गणेश यांचे वडील त्यांना शाळेत सोडायला जात असत.
गणेश यांच्या शालेय शिक्षणातही अडथळे निर्माण झाल्याने वडील विठ्ठल बरैया यांनी दलपत कटारिया यांच्या शाळेत गणेशचा प्रवेश घेतला. त्या शाळेने गणेश यांना खूप मदत केली. खटल्यासाठीही दलपत कटारिया यांनी गणेश यांना चार लाख रुपयांची मदत दिली.
वैद्यकीय शिक्षण घेण्याकरता गणेश यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यात यश मिळाल्यानं आज ते जगातले सर्वांत कमी उंचीचे डॉक्टर झाले आहेत.