गगनयान कार्यक्रमांतर्गत चार चाचणी मोहिमांपैकी ही एक आहे. गगनयान मोहिमेविषयी इस्रोच्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊया.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अवकाशात आणखी एक झेप घेण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस चाचणीसाठी विकसित केलेल्या अंतराळयानातून अंतराळवीरांना बाहेर काढणाऱ्या क्रू एस्केप सिस्टीमची चाचणी घेण्याचं नियोजन इस्रोनं केलं आहे. इस्रोने एक्सवर (ट्विटरवर) यासंबंधीची काही छायाचित्र शेअर केली असून, तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितले आहे.
advertisement
याबाबत इस्रोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ''क्रू एस्केप सिस्टीम हा गगनयानाचा महत्त्वाचा घटक आहे. या महिन्यात TV-D1 या चाचणी वाहनाची चाचणी केली जाईल. ही चाचणी गगनयान कार्यक्रमांतर्गत चार चाचणी मोहिमांपैकी एक आहे. त्यानंतर दुसरं चाचणी वाहन TV-D2 आणि पहिल्या मानवरहित गगनयानाची (LVM3-G1) चाचणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत चाचणी वाहन मोहिमेत (TV-D3 आणि D4) आणि LVM3-G2 रोबोटिक पेलोडसह पाठवण्याची योजना आहे."
विक्रम साराभाई अंतराळ केंद्र अर्थात व्हीएसएससी हे अंतराळ विभागाच्या अंतर्गत इस्रोचे प्रमुख केंद्र असून ते तिरुवनंतपुरम येथे स्थित आहे. या केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर म्हणाले की, "आमची तयारी जोरात सुरू आहे. अंतराळयान प्रणालीचे सर्व भाग प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचले आहेत. त्यांची जोडणी सुरू आहे. आम्ही ऑक्टोबर महिन्यात त्याच्या प्रक्षेपणासाठी तयार आहोत. या क्रू एस्केप सिस्टीमसह आम्ही उच्चदाब आणि ट्रान्सेनिक परिस्थितीसारख्या विविध परिस्थितींची चाचणी करणार आहोत."
इस्रोचं हे मिशन खूप खास आहे. वास्तविक ही चाचणी अंतराळात मानवी मोहीम पाठवण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे. जर ते यशस्वी झालं तर भारत अंतराळ क्षेत्रात आणखी एका यशस्वी कामगिरीची नोंद करेल.