ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगड येथील आहे. अवघ्या सहावीत शिकणारी मानवी सिंह नावाची 12 वर्षांची मुलगी रविवारी सकाळी अंघोळीला गेली होती. साधारण 11:30 वाजता ती बाथरुममध्ये गेली, पण जवळपास एक तास उलटूनही ती बाहेर आली नाही. आई नीतू सिंहने आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घरच्यांनी जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत जे दिसलं ते धक्कादायक होतं.
advertisement
कुटुंबीयांनी प्लंबरची मदत घेऊन बाथरुमचा दरवाजा तोडला. आत जे दृश्य दिसलं, ते पाहून सगळ्यांचे हातपाय सुटले. मानवी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं.
फक्त दोन दिवसांपूर्वीच मानवीचा वाढदिवस साजरा झाला होता. हसरी, उत्साही आणि अभ्यासात हुशार अशी ती मुलगी काही क्षणांत सगळ्यांना कायमची सोडून गेली.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बंद बाथरुममध्ये गॅस गिझर चालू असल्याने ऑक्सिजन कमी झाला आणि कार्बन मोनॉक्साइडची मात्रा वाढली. त्यामुळे तिचा श्वास घुटमळला आणि दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, गॅस गिझर नेहमी हवा खेळती असलेल्या ठिकाणीच वापरावा आणि बंद बाथरुममध्ये कधीही चालू ठेवू नये. नाहीतर अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात.
