अशाच काही महनत आणि जिद्दीच्या कहाण्या समोर आल्या आहेत. त्यांचं यश आणि खडतर आयुष्य तुम्हाला भावनीक करतील.
मिठाई खरेदी करण्याइतकेही पैसे नसताना आईने मुलीच्या यशासाठी फक्त साखर देऊन तोंड गोड केलं. कुणी एका हातानेच आपली यशोगाथा लिहिली कारण तो दिव्यांग आहे… तर कुणी स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत डिप्टी कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अशा अनेक प्रेरणादायी कथा झारखंडच्या दुर्गम, आदिवासी आणि ग्रामीण भागातून समोर येत आहेत.
advertisement
झारखंड लोक सेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेत यश मिळवणाऱ्या बबिता पहाडिया, विष्णु मुंडा आणि सूरज यादव यांची ही असामान्य यशोगाथा आहे. गरिबी, अडथळे आणि सामाजिक बंधनं ओलांडत त्यांनी आपल्या जिद्दीने आयुष्य बदलून टाकलं.
बबिता पहाडिया : विलुप्त होणाऱ्या जमातीची पहिली मुलगी
झारखंडमधील पहाडिया जमात आजही आधुनिकतेच्या शर्यतीत खूप मागे आहे. इतकी की या जमातीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पार्श्वभूमीत जर एखादी मुलगी मोठी ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहते तर चर्चा तर होणारच…
बबिताच्या घराची आर्थिक परिस्थिती एवढी बिकट की तिच्या समाजाबद्दल म्हणतात “ते कधी म्हातारे होत नाहीत, कारण नशेच्या आहारी जाऊन तरुणपणीच त्यांचा मृत्यू होतो.” वडील प्रायव्हेट स्कूलमध्ये हेल्पर, आई गृहिणी, भाऊ पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो. अशा परिस्थितीत ही परीक्षा देणं सोपं नव्हतं.
चार भावंडांमध्ये वडिलांनी आधीच बबिताचं लग्न लावून देण्याचा विचार केला. पण बबिताने ठामपणे सांगितलं “सरकारी नोकरी मिळेपर्यंत मी लग्न करणार नाही.” त्यासाठी तिला टोमणेही सहन करावे लागले. शेवटी तिच्या चिकाटीला यश मिळालं JPSC मध्ये 337वा क्रमांक मिळवत ती ऑफिसर झाली.
25 जुलैला निकाल लागला तेव्हा घरात मिठाई आणण्यासाठीही पैसे नव्हते. पण आईने आनंद ढळू दिला नाही. तिने साखर खाऊन मुलगी आणि शेजाऱ्यांचं तोंड गोड केलं. आता बबिता आपल्या समाजातील इतर मुलींनाही शिकायला आणि पुढं यायला मदत करणार आहे.
विष्णु मुंडा : एक हाताने लिहिलं आपलं यश
रांची जिल्ह्यातील गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले विष्णु मुंडा हा जन्मत:च दिव्यांग आहेत. आईने गर्भावस्थेत घेतलेल्या औषधामुळे त्यांचा एक हात नीट विकसितच झाला नाही. वडील दिवसभर दिहाडी कामगार तर रात्री गेस्ट हाऊसचे गार्ड म्हणून काम करतात. घर चालवण्यासाठी आईची धडपड सुरूच.
9 वर्षं त्यांनी अपयशाची चव चाखली, पण हार मानली नाही. ट्यूशन शिकवत आदिवासी हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास सुरू ठेवला. अखेर 4 वाजता सकाळी निकाल लागला आणि विष्णुंना कळलं. या वेळेस त्यांनी JPSC उत्तीर्ण करून आयुष्याचा चेहराच बदलला आहे.
सूरज यादव : स्विगी बॉय ते डिप्टी कलेक्टर
गिरिडीहच्या कपिलो गावातील सूरज यादवचे वडील बांधकाम मजूर. घरची परिस्थिती एवढी खालावलेली की कॉलेज आणि स्पर्धा परीक्षांसाठी पैसे मिळवणं शक्य नव्हतं. त्यामुळे सूरजने रांचीमध्ये स्विगी डिलिव्हरी बॉय आणि रॅपिडो रायडर म्हणून काम सुरू केलं.
पण त्यासाठी बाइकही नव्हती. त्याचे मित्र राजेश नायक आणि संदीप मंडल यांनी आपली शिष्यवृत्तीची रक्कम देऊन बाइक खरेदी करायला मदत केली. दिवसातून ५ तास डिलिव्हरी आणि बाकी वेळ अभ्यास. अशा संघर्षानंतर सूरज अखेर JPSC मध्ये यशस्वी झाला आणि डिप्टी कलेक्टर बनला.
इंटरव्ह्यूदरम्यान जेव्हा सूरजने बोर्डसमोर डिलिव्हरी बॉयचं काम सांगितलं तेव्हा ते चकित झाले. सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं सांगत नाही ना, हे तपासण्यासाठी बोर्डने डिलिव्हरीची तांत्रिक माहिती विचारली. सूरजने प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आणि त्याच्या मेहनतीचं सोनं झालं.
या तिन्ही कथा एकच शिकवण देतात. अभावं असली तरी स्वप्नं मोठी असावीत. संघर्ष कितीही लांब असला तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत कधीच वाया जात नाहीत. झारखंडच्या या दुर्गम गावांमधून उठलेली ही माणसं आज हजारोंना प्रेरणा देत आहेत.