मलेशियन एअरलाइन्सच्या 2014 मध्ये गायब झालेल्या एका आंतरराष्ट्रीय विमानाच्या शोधाबाबत आता नवं संशोधन केलं जातंय. सागरी प्राण्यांचा अभ्यास करून हरवलेलं विमान नक्की कुठे असेल, याचा शोध घेतला जाणार आहे. अमेरिकेतील साउथ फ्लोरिडा विद्यापीठातल्या भूवैज्ञानिकांनी विमानाचा शोध घेण्यासाठी एक संशोधन केलंय. बर्नाकल्स या समुद्रातल्या प्राण्यांच्या शिंपल्यांच्या साह्यानं विमानाचे अवशेष व ते पडल्याचं नेमकं ठिकाण शोधून काढता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. “9 वर्षांपूर्वी हरवलेल्या या विमानाचा शोध घेण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होईल व अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल,” असं या अभ्यासाचे मुख्य लेखक नासर-अल-कत्तन यांचं म्हणणं आहे. या अभ्यासाचे सहलेखक असलेले प्राध्यापक ग्रेगरी हर्बर्ट हे संवर्धक जीवशास्त्रज्ञ आहेत. समुद्रातल्या अशा कवच असलेल्या प्राण्यांबाबत त्यांचा अभ्यास आहे. गेल्या 2 दशकांमध्ये त्यांनी अशा प्राण्यांच्या शिंपल्यांमधून समुद्राचं तापमान मोजण्याची एक पद्धत विकसित केली आहे.
advertisement
viral news :...जर पृथ्वीवरील एखाद्या शहरावर लघुग्रह आदळला तर काय होईल?
नियंत्रित वातावरणात बर्नाकल्स या जिवंत समुद्री प्राण्यांचा कसा विकास होतो, याबाबत पहिले संशोधन करण्यात आलं. पाण्यातल्या तापमान बदलाचे त्यांच्यावर कसे परिणाम होतात यांची नोंद घेतली गेली. याचा उपयोग करून विमानाच्या फ्लॅपरॉनच्या अवशेषावर सापडलेल्या काही छोट्या बर्नाकल्स शिंपल्यांचा अभ्यास करण्यात आला. जिवंत बर्नाकल्सशी त्यांची तुलना करून पाण्याच्या तापमानाच्या नोंदी करण्यात आल्या.
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड गॅलवेमधले बर्नाकलतज्ज्ञ आणि समुद्रशास्त्रज्ञांच्या मदतीनं, त्यांनी बर्नाकल्सच्या पाण्याच्या तापमानाच्या नोंदी ओशनोग्राफिक मॉडेलिंगसह एकत्र केल्या आणि त्या वेळच्या पाण्याच्या प्रवाहाबाबतची पुनर्रचना तयार केली. या संशोधनाकरता मोठी व जुनी बर्नाकल्स उपलब्ध झाली नाहीत, पण यामुळे पाण्याच्या प्रवाहाबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते व विमान नेमकं कुठे पडलं हे शोधता येऊ शकतं, असं हर्बर्ट यांचं मत आहे.
द सेव्हन्थ आर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरमध्ये हजारो किलोमीटर अंतरावर विमानाचा शोध घेण्यात आला. फ्रेंच शास्त्रज्ञ आणि फ्लॅपरॉनचं पहिलं संशोधन करणाऱ्यांपैकी एक जोसेफ पॉपिन यांच्या निष्कर्षानुसार, फ्लॅपरॉनवर असलेले सर्वांत मोठे आणि जुने बर्नाकल्स अपघातानंतर लगेचच त्यावर चिकटले असावेत. त्यावरून विमानाचे अवशेष आत्ता कुठे असतील, याचा नेमका शोध घेता येऊ शकतो. तसं असेल तर त्या शिंपल्यांमधलं तापमान संशोधकांना त्यांच्या शोधाजवळ नेऊ शकेल असं हर्बर्ट यांना वाटतं.
चांद्रयान-3 नंतर आणखी एक यश! विद्यार्थ्यांनी शोधले 5 लघुग्रह, नासाने दिली मान्यता
या संशोधनाच्या आधाराने मलेशियाच्या गायब झालेल्या विमानाचा शोध लवकरच लागू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.