विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने अपघातात त्याचा पाय खराब झाल्याचं दाखवलं. यासाठी त्याने असा पर्याय अवलंबला ज्यामुळे त्याचे पाय खरंच खराब झाले आणि त्याला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. त्याच वेळी त्याचं नाटकही उघडकीस आलं आणि आता त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला आहे. तैवानमधील या व्यक्तीचं नाव चांग असल्याचं सांगण्यात येत आहे. 24 वर्षीय चांगला गेल्या वर्षी ताइपे येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी त्याच्या स्कूटरचा अपघात झाल्याचे त्याने सांगितले. मात्र आता विम्याचे पैसे मिळावेत म्हणून त्याने आपल्या सहकाऱ्यांसह स्वतःच्या पायाला इजा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
न्यूजवीकच्या वृत्तानुसार, चांगने त्याचे पाय 10 तासांपेक्षा जास्त काळ ड्राय बर्फात ठेवले जेणेकरून त्याच्या पायांचा खालचा भाग जखमी दिसावा. हा दावा खरा ठरला असता तर चांगला अंदाजे 10 कोटी 53 लाख रुपये मिळू शकले असते. पण त्याला पैसेही मिळाले नाहीत आणि उलट त्याला त्याचा पाय गमवावा लागला. चांग याच्यावर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तातडीची शस्त्रक्रिया झाली होती. ताइपे जिल्हा अभियोक्ता कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, त्याचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापावे लागले.
कारण कोरड्या बर्फात तासनतास पाय थंड ठेवल्यानंतर त्याच्या पायांमध्ये हाडांची नेक्रोसिस आणि सेप्सिस विकसित झाली होती. यानंतर चांग आणि त्याचा साथीदार लियाओ यांनी विम्यासाठी दावे केले, त्यापैकी 5 लाख 26 हजार रुपयांचा केवळ एक दावा यशस्वी झाला. परंतु उर्वरित आठ दावे फेटाळण्यात आले. विमा कंपनीने संशय व्यक्त केला आणि चांग आणि लियाओ यांची चौकशी केली असता असं आढळून आलं की चांगने प्लास्टिकची बादली ड्राय बर्फाने भरली होती आणि त्यात पाय ठेवून बसला होता. त्यानंतर त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. परंतु त्याचे पाय इतके खराब झाले होते की ते कापावे लागले.
पोलिसांचं म्हणणं आहे, की चांगने काही दिवसांपूर्वीच विमा काढला होता, ज्यामुळे त्याच्यावरील संशय वाढला होता. परंतु जखमा कशाप्रकारच्या आहेत, हे पाहून त्याचं खोटं उघड झालं. तैवानचं हवामान असं आहे की बर्फाळ थंडीमुळे पाय गोठण्यासारख्या घटना तिथे घडत नाहीत. दोन्ही पायांवरील जखमा सारख्याच होत्या, ज्या फ्रॉस्टबाइटमध्येही दिसत नाहीत, असं आढळून आलं. हे देखील स्पष्ट झालं की कथित अपघाताच्या वेळी चांगने मोजे किंवा बूट घातले नव्हते.