28 वर्षांची सारा आणि तिचा पती कॉलीन यांनी अमेरिकेच्या ओहायोमध्ये जवळपास 4 लाख डॉलरमध्ये (जवळपास 3.3 कोटी रुपये) घर विकत घेतलं. नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर आयुष्यातलं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना सारा आणि कॉलीन यांची होती, पण पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. हे घर त्यांच्यासाठी आजार आणि तणावाचं कारण बनलं.
advertisement
घरामध्ये शिफ्ट होताच दोन दिवसांनंतर साराला सर्दी खोकला सुरू झाला. सुरूवातीला हे सामान्य वाटल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली. या औषधांनी तिला बरं वाटलं, पण नंतर समस्या वाढत गेली. सहा महिन्यांच्या आतच तिच्या डोळ्यांच्या आसपास लाल फोड आणि खाज यायला सुरूवात झाली. साराची अवस्था इतकी वाईट झाली की तिची त्वचा फाटून रक्त यायला लागलं.
घराच्या आतमध्ये डार्क सिक्रेट
साराने तिला होणारा हा त्रास सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा काही यूजर्सनी घरामध्ये असलेल्या फंगस (बुरशी) मुळे तिची अशी अवस्था झाल्याचा अंदाज लावला. हा सल्ला ऐकून सारा आणि तिच्या पतीने घराची तपासणी करायचं ठरवलं, यासाठी त्यांनी प्रशिक्षित 'मोल्ड डॉग'ला बोलावलं, ज्याने घरातल्या प्रत्येक भागात पाण्यामुळे झालेलं नुकसान आणि फंगस शोधून काढलं. सर्वाधिक फंगस कार्पेट आणि भिंतीच्या आत होतं. तपासामध्ये हेदेखील स्पष्ट झालं की घराच्या छतावर पाण्याने झालेलं नुकसान पांढऱ्या रंगाने लपवण्यात आलं होतं.
या संपूर्ण प्रकारामुळे आपल्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाल्याचं साराचं म्हणणं आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तिला जवळपास 10 हजार डॉलर्स (8.3 लाख रुपये) खर्च आला, पण विमा कंपनीने यात कोणतीच मदत केली नसल्याचा दावा साराने केला आहे. याशिवाय साराला तिच्या घरातील 90 टक्के सामान फेकून द्यावं लागलं, कारण या सामानामध्येही बुरशीचा शिरकाव झाला होता.
साराच्या लग्नावरही परीणाम
या स्थितीमुळे माझ्या लग्नावरही परिणाम झाल्याचं सारा सांगते. अनेकवेळा मला माझ्या नवऱ्यापासून लांब आई-वडिलांकडे किंवा सासरी राहावं लागलं. पतीला या बुरशीचा फार त्रास झाला नाही, कारण तो बहुतेकवेळा घरातून बाहेरच असायचा, पण मी वर्क फ्रॉम होम करायचे, असं सारा म्हणाली. सारा जेव्हा तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली तेव्हा तिची तब्येत सुधारली. दोन आठवड्यात तिचे डोळे नीट झाले, पण यानंतर जेव्हा ती घरी गेली तेव्हा पुन्हा तिला तसाच त्रास व्हायला लागला.
ऑनलाईन फंड रेजिंग कॅम्पेनच्या माध्यमातून साराला 5 हजार डॉलरची आर्थिक मदत केली गेली, पण तरीही हा अनुभव मानसिक त्रास देणारा असल्याची प्रतिक्रिया साराने दिली आहे.
