बदुई जनजाति कोण आहेत?
बदुई हा सुंडानी संस्कृतीचा पारंपरिक समुदाय आहे. त्यांनी जाणूनबुजून आधुनिक जगापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हे लोक इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रदेशातील कनेकेस गावात राहतात. जकार्तापासून साधारण 4–5 तासांवर. शहर इतकं जवळ असूनही, बदुई लोक तंत्रज्ञानापासून दूर, नैसर्गिक आणि साध्या आयुष्याला प्राधान्य देतात. त्यांच्या पद्धती, श्रद्धा आणि नियम शतकानुशतके जसंच्या तसं टिकून आहेत.
advertisement
भविष्य सांगण्याची शक्ती?
बदुई समुदायाला पृथ्वीवरील अत्यंत प्राचीन मानववंशांपैकी एक मानलं जातं. त्यांच्या 'धर्मगुरूं'वर लोकांचा अपार विश्वास आहे. असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे मनातील विचार ओळखण्याची क्षमता आहे, एवढंच नाही तर भविष्यातील घटनांचा अंदाज बांधण्याची शक्ति देखील आहे. तसंच ते निसर्गाला देवत्व मानतात. जंगल, पर्वत आणि नद्या यांच्या रक्षणासाठी त्यांच्याकडे कडक नियम आहेत. त्यांची सादगी आणि निसर्गाशी नातं त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू आहे.
त्यांचं जीवन कसं असतं?
बदुई लोक नद्यांच्या काठावरील दऱ्या, टेकड्या आणि लहान-लहान वस्त्यांमध्ये राहतात. त्यांचा समुदाय दोन भागांत विभागलेला आहे:
1) आंतरिक बदुई (Baduy Dalam)
हे बदुईंचं अत्यंत पारंपरिक गट ते जंगलाच्या आतल्या सिबेओ, सिकेउसिक आणि सिकेरतावरना या तीन गुप्त गावांमध्ये राहतात.
त्यांची वैशिष्ट्ये:
आधुनिक जगाशी पूर्ण तुटलेलं नातं, ते गाड्या, चप्पलसुद्धा वापरत नाही. फक्त पांढरे–काळे पारंपरिक कपडे घालतात आणि बांबू तसेच पानांनी बनवलेली त्यांची घरं असतात.
हे लोक पारंपारिक शेती करतात. सामुदायिक धान्यसाठा (लेउइट) जो फक्त लग्नासारख्या प्रसंगी वापरतात. त्यांच्याकडे बाहेरील लोकांना सहज प्रवेश नसतो आणि ते स्वतःही बाहेर फारसे जात नाहीत.
2) बाह्य बदुई (Baduy Luar)
हे लोक आंतरिक बदुईंपेक्षा थोडे मोकळे आणि बदल स्वीकारणारे आहेत. नद्यांच्या काठावर असलेली गावे (मारेंगो, सिकडु इ.) गाड्या, चप्पल, काही आधुनिक कपडे वापरण्याची मुभा त्यांना असते. काळ्या कपड्यांसोबत निळसर-काळा हेडस्कार्फ ते बांधतात. मध, ताडगोळा आणि फळं विकण्यासाठी शहरांमध्ये (जकार्ता, बोगोर) ते जातात.
हे लोक सोलर पॅनल वापरतात. तसेच फोन देखील मर्यादित प्रमाणात वापरतात. तरीही, तेही आपली मूलभूत परंपरा आणि नियम काटेकोरपणे पाळतात.
‘पुउन’ कोण असतात?
बदुई जमातीचे आध्यात्मिक आणि सामाजिक प्रमुख म्हणजे पुउन. त्यांचा शब्द म्हणजेच अंतिम निर्णय. ते परंपरा, विधी, शेती, दैनंदिन नियम सगळं नियंत्रीत करतात. त्यांच्या मताचा मान संपूर्ण समुदाय ठेवतो
जमिनीला ते “तनेउह तितिपन” म्हणजे देवाने सोपवलेली भूमी मानतात. म्हणूनच जंगल, पर्वत, पाणी यांचं नुकसान करणं त्यांच्या दृष्टीने मोठं पाप समजलं जातं.
या गावात साबण, शॅम्पू, टूथपेस्ट घेऊन जाणं पूर्ण मनाई आहे. सिगारेट, दारू, ड्रग्ज वर देखील बंदी आहे. कचरा फेकणे, झाडं तोडणे, संरक्षित जंगलात जाणे, आंतरिक बदुई भागात विदेशी पर्यटकांना पूर्ण मनाई आहे. इथे साधे कपडे, शांत वर्तन आणि त्यांच्या परंपरांचा आदर हे अत्यावश्यक.
