पैसे कमावणं सध्या अवघड नाही; मात्र त्यासाठी वापरला जाणारा मार्ग कठीण किंवा सोपा असू शकतो. एका चायनीज मुलीनं ऑनलाइन पद्धतीनं वस्तूंची विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत; मात्र तिची विक्री करण्याची पद्धत खूपच विचित्र आहे. ती इतक्या वेगानं वस्तू दाखवते, की पाहणाऱ्यांची पापणी मिटली, तरी एखादी वस्तू त्यांच्या नजरेतून सुटू शकते. या पद्धतीनं तिनं सात दिवसांत 155 कोटी रुपये कमावले आहेत, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.
advertisement
चायनीज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर
काही दिवसांपूर्वी @PicturesForlder या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तो आता व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक मुलगी तिच्याकडच्या वस्तूंची विक्री करताना दिसतेय. ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लाइव्ह स्ट्रीमरही आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून ती त्या वस्तू ऑनलाइन विकते. डझनभर वस्तू ती अतिशय कमी वेळात प्रेक्षकांना दाखवते.
सात दिवसांत 155 कोटी
ती मुलगी तिच्याकडची प्रत्येक वस्तू प्रेक्षकांना केवळ 3 सेकंद दाखवते आणि लगेचच दुसऱ्या वस्तूकडे वळते. ती ज्या वेगानं वस्तू दाखवते, त्यामुळे त्या नीट पाहताही येत नसतील. त्या वस्तू खरंच पाहायच्या असतील, तर व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. टाइम्स ऑफ इंडियाच्या नोव्हेंबर 2023 च्या रिपोर्टनुसार, त्या मुलीचं नाव Zheng Xiang Xiang असं आहे. ती एक चायनीज लाइव्ह स्ट्रीमर आहे. तिनं या पद्धतीनं आत्तापर्यंत खूप पैसे कमावले आहेत.
व्हिडिओ व्हायरल
तिच्या त्या विचित्र पद्धतीनं केलेल्या व्हिडिओला एक्सवर आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एकानं म्हटलंय, की ही मुलगी 2017 सालापासून लाइव्ह स्ट्रीमच्या बिझनेसमध्ये आहे व या पद्धतीनं ती वस्तू विकते. दुसऱ्यानं म्हटलंय, की चिनी लोकांना टिकटॉकच्या युगातल्या पिढीचा अटेन्शन स्पॅन कमी असल्याची जाणीव आहे. त्याचाच ती फायदा घेत आहे.
ऑनलाइन विक्रीचा अनेकांना आतापर्यंत फायदा झाला आहे. चिनी व्यापाऱ्यांना लोकांच्या बदलत्या मानसिकतेचा व तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेता येतो. त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.