सूर्याला भेदणाऱ्या रॉकेटचं अनोखं दृश्य 6 सप्टेंबर 2025 रोजी स्पेसएक्सच्या मोहिमेवेळी टिपण्यात आलं. फ्लोरिडातील केप कॅनावेरल इथून स्टारलिंक उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. ज्यामध्ये बूस्टर 1069 ने त्याचं 27 वं उड्डाण केलं आणि 28 उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचवलं. यावेळी अॅस्ट्रोफोटोग्राफर अँड्र्यू मॅकार्थी यांनी हा अद्भुत व्हिडीओ टिपला आहे.
मंगळाच्या आत काय? लाल ग्रहाच्या हृदयाचं टाळं उघडलं, सापडलं असं काही शास्त्रज्ञ थक्क, मोठा शोध
advertisement
मॅकार्थी यांनी लाँच पॅडपासून आठ मैल पश्चिमेला आपला कॅमेरा ठेवला. त्यांनी स्पेसएक्सचं फाल्कन9 रॉकेट सूर्याच्या क्रोमोस्फियरमधून म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाच्या वरील थरातून जाताना टिपलं. रॉकेट आणि सूर्याचं एकाच वेळी इतक्या नेत्रदीपकपणे छायाचित्रण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पूर्वी सूर्यासमोरून जाणाऱ्या रॉकेटच्या प्रतिमा फक्त पांढऱ्या प्रकाशात टिपल्या जात होत्या. पण मॅकार्थीच्या प्रतिमेने जगाला सूर्याच्या क्रोमोस्फियरची खरी, रंगीत झलक दिली. त्यांनी ही प्रतिमा एका विशेष सौर दुर्बिणी आणि खगोलशास्त्र कॅमेरा वापरून टिपली, ज्यामध्ये रॉकेटची सावली सूर्याच्या ज्वलंत ज्वाला आणि प्लाझ्मा लाटांमधून जात असल्याचं दिसून आलं. रॉकेटच्या आगीमुळे प्रकाश देखील विखुरला आणि बदलला.
याव्यतिरिक्त मॅकार्थीने कॅनन R5 कॅमेरा आणि सौर फिल्टरसह टेलिफोटो लेन्स वापरून पांढऱ्या प्रकाशाच्या प्रतिमा देखील घेतल्या. हायड्रोजन-अल्फा कॅमेऱ्याने घेतलेली नारंगी रंगाची प्रतिमा विशेषतः लक्षवेधी होती, कारण त्यात सूर्याचे सूक्ष्म आणि सुंदर नमुने स्पष्टपणे दिसून आले. यात सूर्याचे क्रोमोस्फियर हायड्रोजन-अल्फा प्रकाशात दाखवलं आहे, जे त्याच्या ज्वलंत ज्वाला आणि फिरणारे प्लाझ्मा थर स्पष्टपणे प्रकट करतं.
मॅकार्थी यांनी या प्रतिमेचे वर्णन करताना म्हटले आहे की, "हा फोटो अवकाशाचा एक वेगळा दृष्टिकोन देतो, जो विज्ञान आणि कला एकत्र करून आपल्या विश्वाबद्दल उत्सुकता निर्माण करतो." ही प्रतिमा सूर्याच्या क्रोमोस्फीअरमधून जाणाऱ्या रॉकेटचा पहिला ज्ञात फोटो आहे, ज्यामुळे तो खगोल छायाचित्रण आणि अवकाश अभ्यासात एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.