धाराशिव - वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे अनेकजण आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. काही जण तर वाढदिवसाच्या दिवशी एक नव्हे त्यापेक्षा जास्त केक कापतात, असेही दिसून येते. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील तिरुपती ग्रुपच्या माध्यमातून एक अनोखे कार्य केले जात आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील तिरुपती ग्रुपचे काम वाखाणण्याजोगे आहे. कारण या ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस असेल तो वाढदिवस केक कापून साजरा केला जात नाही. तर फळे कापून साजरा केला जातो. मागील वर्षभरापासून तिरुपती ग्रुपकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
ग्रुपमधील ज्या सदस्याचा वाढदिवस आहे त्याचा फेटा व हार घालून सत्कार केला जातो. त्यानंतर केक न कापता वातावरणानुसार मिळणारे फळ जसे की सफरचंद, पेरू सिताफळ, कलिंगड यांसारखे फळ कापून हा वाढदिवस साजरा केला जातो. तसेच सर्व मित्रांच्या सोबतीने ते फळ खाल्ले जाते.
याठिकाणी वाढदिवसावर कोणताही अवांतर खर्च केला जात नाही. जसे की फटाके वाजवले जात नाहीत किंवा कोणताही अनावश्यक खर्च केला जात नाही. अनेक तरुण मंडळांनी हा उपक्रम राबवला तर निश्चितच आरोग्यासाठी याचा फायदा होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील तिरुपती ग्रुपच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे.