Gudhi Padwa Time: यंदा गुढीकाठी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6.53 नंतर; दा. कृ. सोमण यांनी सांगितले कारण...
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Gudhi Padwa Time: येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी सकाळी 6.53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की..
मुंबई : येत्या गुरूवारी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या सणाची तयारी आधीपासून केली जाते. लोकांनी गुढीकाठ्या आणूनही ठेवल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्याला खरेदीचा उत्साह असतो, पण आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. नैवेद्य अर्पण करून घरात सर्वांनी प्रसाद खाल्ला जातो. यंदा गुढीकाठी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्त्व याविषयी ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी माहिती दिली आहे.
येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी सकाळी 6.53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सूर्योदयाला नसल्याने क्षयतिथी आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 6.53 वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर नवीन वर्ष शालिवाहन शक 1948 पराभवनाम संवत्सर सुरू होत आहे.
advertisement
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. संवत्सराचे नाव पराभव आहे. या नूतन वर्षात अनीतीने, असत्याने, दुष्टपणाने, स्वार्थीपणाने, भ्रष्टाचारीवृत्तीने वागणाऱ्यांचा पराभव होणार आहे, असा या नावाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. संवत्सरांची एकूण 60 नावे असून ती क्रमाक्रमाने येत असतात. यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आल्याने अमावास्या तिथी समाप्तीनंतर गुढीपाडवा सण आला होता. आता या वर्षानंतर 10 एप्रिल 2032 रोजी गुढी पाडव्याला अशी स्थिती येणार आहे, सोमण यांनी सांगितले.
advertisement
गुढी पाडव्याच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आधीच घरी आणून ठेवणे गरजेचे आहे. नंतर सकाळी धावपळ टाळता येईल, शुभ मुहूर्तावर गुढी उभारून पूजा केल्याचा कुटुंबातील लोकांना फायदा होतो, असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याला शुभ दिवस मानून या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण असून त्या दिवसापासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2083 सुरू होईल. या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीची सुरुवात होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 5:50 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gudhi Padwa Time: यंदा गुढीकाठी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6.53 नंतर; दा. कृ. सोमण यांनी सांगितले कारण...






