Board Exam: कॉपी करताना हजारदा विचार करा! बोर्डाचा मोठा निर्णय, थेट अजामीनपात्र गुन्हा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Board Exam: लवकरच दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होत असून याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना कॉपी करणं महागात पडणार आहे.
पुणे: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहे. या परीक्षांत कॉपी करणं विद्यार्थ्यांना महागात पडणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता परीक्षेत गैरप्रकार करताना आढळल्यास थेट दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारांना उद्युक्त करणारे आणि मदत करणाऱ्यांवरही थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला यंदा 31 लाखांवर विद्यार्थी सामोरं जात आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत असून 14 लाख 94 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. तर 16 लाख 7 हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी समुपदेशक नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल. पण कॉपी करणे विद्यार्थ्यांना महागात पडणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलीये.
advertisement
कॉपी न करण्याचे आवाहन
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विविध बैठका झाल्या असून विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी पडू नये आणि शांतपणे पेपर लिहावेत. कोणत्याही प्रकारे कॉपी करू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल, परीक्षेचा तणाव असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात. फोनवर त्यांना संपर्क करू शकतात, असेही मंडळाने स्पष्ट केलेय.
advertisement
हॉल तिकीट विसरले तरी परीक्षेची मुभा
हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला त्या दिवशी परीक्षेला बसू दिले जाईल. मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावेच लागेल. परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येईल, असेही परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांची तपासणी केल्यावरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 08, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
Board Exam: कॉपी करताना हजारदा विचार करा! बोर्डाचा मोठा निर्णय, थेट अजामीनपात्र गुन्हा