UPSC Success Story : दहावीच्या निकालानंतर आलं लग्नासाठी स्थळ, घरच्यांशी भांडली; पुण्याची शामल 24 व्या वर्षी बनली कलेक्टर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
युपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या शामलचा संघर्ष शालेय शिक्षणापासून ते अगदी युपीएससीच्या मुलाखतीला जाईपर्यंत सुरूच होता. मुलाखतीची तारीख जाहीर होण्याआधी तिच्या आईचं निधन झालं.
पुणे : नुकताच युपीएससी परीक्षेचा निकाल लागला. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणं हेच यूपीएससी देणाऱ्यांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी अभिमानाची बाब असते. या परीक्षेत पुण्यातील नीरा नदीच्या काठी वसलेलं भगतवाडी या लहानशा गावातल्या 24 वर्षांच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केलंय. गावतल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शामल कल्याण भगत हिने 258वी रँक मिळवत थेट आयएएस पदाला गवसणी घातलीय.
मसूरीच्या 'लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी'त जायचं स्वप्न युपीएससीची तयारी करणारा प्रत्येक उमेदवार पाहत असतो. शामलनं ते स्वप्न पाहिलं अन् आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात ते सत्यातही उतरवलं. पहिल्या प्रयत्नात ती पूर्व परीक्षा क्रॅक करू शकली नव्हती. ग्रामीण भागातील मुली कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणताही क्लास न लावता युपीएससीसारख्या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात, हे तिनं दाखवून दिलंय.
advertisement
गावात चौथीपर्यंत शाळा
दीड हजार लोकवस्ती असलेलं भगतवाडी हे पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातलं गाव. या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. गावातले बहुतांश लोक हे शेती, पशुपालन, शेत मजुरी, रंगकाम या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. अशा गावात एमपीएससी, यूपीएससी हे शब्द मोजक्याच लोकांना माहीत आहेत. त्यामुळं या परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्याही एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी आहे. अशा परिस्थितीत शामलने शिक्षण घेत आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय.
advertisement
युपीएससी परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालणाऱ्या शामलने मुलींना शिकण्याचा आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याचा सल्ला दिलाय. शामलने म्हटलं की, पोरींनो शिका, आपली स्वप्न पूर्ण करा, लोक काय म्हणतील याकडे लक्ष देत बसाल, तर चूल आणि मूल हेच आयुष्यभर करावं लागेल. स्वप्न खरी होतात, फक्त तुम्हाला त्या दिशेनं चालत जाण्याची थोडी हिम्मत दाखवावी लागेल.
advertisement
घरची परिस्थिती बेताची, शिक्षणात हुशार
शामल एकत्र कुटुंबातच लहानाची मोठी झाली. तिचे वडील शेतीसह रंगकाम व्यवसायही करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच तिनं चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण शेजारच्या निरनिमगावमध्ये झालं. दहावीत शाळेत पहिला क्रमांक पटकावल्यानंतर अकरावी आणि बारावीचं शिक्षण तिनं सराटीमधील जिजामाता विद्यालयातून पूर्ण केलं आणि तिथंही बारावीत प्रथम क्रमांक मिळवला. पुढे पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी संपादन केली. याठिकाणीही तिनं विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

advertisement
मुलाखतीआधी आईचं निधन
युपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या शामलचा संघर्ष शालेय शिक्षणापासून ते अगदी युपीएससीच्या मुलाखतीला जाईपर्यंत सुरूच होता. यूपीएससी मुलाखतीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तिच्या आईचं कर्करोगामुळं निधन झालं. अधिकारी होण्याचं स्वप्न जिनं दाखवलं, त्या आईच्या निधनामुळं तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. अशा खडतर परिस्थितीतही ती डगमगली नाही. स्वत:ला सावरत मुलाखतीसाठी तिनं एकटीनं दिल्ली गाठली आणि १० जानेवारीला मुलाखतीचा अवघड टप्पाही पार केला. अखेर प्रतिष्ठेची समजली जाणारी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होत तिनं आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत तिला खरी श्रद्धांजली वाहिली.
advertisement
दहावीच्या निकालानंतर लग्नासाठी आलेलं स्थळ
view commentsदहावीत बोर्डाच्या परीक्षेत शामलनं शाळेत प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला लग्नासाठी स्थळ आलं होतं. तेव्हा शामलने लग्न करायचं नसल्याचं सांगत विरोध केला. यावरून ती घरच्यांशी जोरदार भांडली होती. लग्न न करण्यासाठी भांडल्यानं गावातील लोकांच्या नजरेत ती 'आगाऊ कार्टी' बनली. पण तिने ध्येय डोळ्यासमोर ठेवून चिकाटीने अभ्यास केला. दहावीनंतर, बारावी, पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या २४ व्या वर्षी युपीएससी दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होत जिल्हाधिकारी बनली. गावात युपीएससी पास झालेली ती पहिलीच अधिकारी ठरलीय. दहावीच्या निकालानंतर शामलचं लग्न झालं असतं, तर कदाचित आज ती कलेक्टर बनली नसती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
April 21, 2024 11:01 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
UPSC Success Story : दहावीच्या निकालानंतर आलं लग्नासाठी स्थळ, घरच्यांशी भांडली; पुण्याची शामल 24 व्या वर्षी बनली कलेक्टर


