झटपट प्रगती अन् हवीये अपत्य प्राप्ती, 'अशोक खरात'पेक्षा भयंकर, बीडमध्ये 9 भोंदू बाबांना बेड्या!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Beed News: बीडमध्ये काही भोंदू बाबा आपण देवाचा अवतार असल्याचं भासवतात आणि लोकांना भीती दाखवून लाखो रुपये उकळतात.
बीड: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. भोंदूबाबावर कारवाई झाल्यापासून रोज नवी प्रकरणे समोर येत आहेत. अंगारा, गंडा-दोरा आणि दैवी शक्तीचा बनाव करून त्याने अनेक महिलांचे शारीरिक व आर्थिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. आता बीड जिल्ह्यातून देखील खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांत अशाच 9 भोंदूबाबांवर कारवाई झाली आहे.
बीडमधील भोंदूंनी शारीरिक शोषणापर्यंत मजल मारली नसली, तरी विधीच्या नावाखाली लाखोंची लूट केल्याचे उघड झाले आहे. बीड जिल्ह्यात भोंदूगिरी फोफावण्यामागे जमिनीत गाडलेलं गुप्तधन काढून देण्याचं आमिष कारणीभूत ठरलं आहे. तसेच व्यवसायात झटपट यश, अपत्यप्राप्ती, सततचे आजारपण यांमुळे अनेकांना या भोंदूबाबांनी जाळ्यात ओढले. तसेच विधींच्या नावाखाली अघोरी प्रकार केल्याचे समोर आले आहे.
advertisement
देवाचा अवतार सांगून लाखोंची लूट
बीडमध्ये काही भोंदू बाबा आपण देवाचा अवतार असल्याचं भासवतात आणि लोकांना भीती दाखवून लाखो रुपये उकळतात. ‘घरावर करणी केली आहे, पितृतोष आहे,’ अशा कारणांनी लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बऱ्याचदा घरातील सोन्याचे दागिने शुद्ध करण्याच्या नावाने देखील फसवणूक झाली आहे. काही वेळा ‘माझा शब्द मोडला तर अनर्थ होईल’, अशी भीती दाखवून देखील महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक गुलाम बनवलं जात आहे.
advertisement
पाच वर्षांत भोंदू जेरबंद
गेल्या 5 वर्षांच्या काळात 9 भोंदू बाबांना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत 7 गुन्हे नोंदवले. आता अशोक खरातवर झालेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा संशयित मठांवर पोलिसांची नजर आहे.
दरम्यान, मांत्रिकांच्या शापाला घाबरून तसेच सामाजिक बदनामीला भिऊन अनेक पीडित लोक पोलिसांपर्यंत जात नाहीत. त्यामुळे भोंदूबाबांचे फावते, असे चित्र सध्या आहे. त्यामुळे असे प्रकार घडल्यास थेट पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहन केले जात आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
झटपट प्रगती अन् हवीये अपत्य प्राप्ती, 'अशोक खरात'पेक्षा भयंकर, बीडमध्ये 9 भोंदू बाबांना बेड्या!








