‘तुम्ही माझ्या मुलीसारख्या..,’ जवळ यायचा अन् नको ते करायचा, संभाजीनगरात शिक्षकाचं धक्कादायक कांड
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: गेल्या वर्षभरापासून हे प्रकार सुरू होत. तसेच कुठं वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली जात होती.
छत्रपती संभाजीनगर : “तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात” असे सांगत विद्यार्थिनींना जवळ घेऊन अश्लील स्पर्श करणाऱ्या शिक्षकाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गुटखा खाऊन मुलींच्या अगदी जवळ चेहरा नेणे, कपड्यांमध्ये चष्मा अडकवून तो काढण्याच्या बहाण्याने आक्षेपार्ह कृत्य करणे, तसेच विरोध केल्यास हात पकडून रोखणे असे प्रकार तो करत असल्याचे उघड झाले आहे. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत हा प्रकार घडला. खाजी मुजिबोद्दीन नसिरोद्दीन (वय 40, रा. मेहमूदपुरा, नॅशनल कॉलनी) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
8 जानेवारी रोजी शाळेत काही शिक्षक रजेवर असल्याने मुख्याध्यापिकांनी तीन वर्गांतील मुले-मुलींना एकत्र बसवले होते. यावेळी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी खाजी मुजिबोद्दीन विनाकारण मारहाण करीत असल्याची तक्रार केली. त्याचवेळी सातवीतील एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापिकेकडे एकांतात बोलण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांच्या दालनात तिने आरोपी शिक्षकाच्या कृत्यांचा सविस्तर पाढा वाचला. तो नेहमी मुलींना जवळ ओढतो, “तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात” असे म्हणत अश्लील स्पर्श करतो, गुटखा खाऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो, दूर जाण्याचा प्रयत्न केला की हात पकडून ठेवतो, असे तिने स्पष्ट केले.
advertisement
संभाजीनगर हादरलं! सकाळी शेतात गेला, तो परतालच नाही, माजी सरपंचाच्या मुलासोबत संक्रांतीलाच भयंकर घडलं
या धक्कादायक माहितीने मुख्याध्यापिका हादरल्या. त्यानंतर इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेतले असता आणखी सहा मुलींनीही आरोपीच्या अशाच कृत्यांची कबुली दिली. कपड्यांमध्ये चष्मा अडकवून आक्षेपार्ह वर्तन करणे, गेल्या वर्षभरापासून हे प्रकार सुरू ठेवणे आणि वाच्यता केल्यास धमकावणे, असे गंभीर आरोप त्यांनी केले.
advertisement
मुख्याध्यापिकांनी तात्काळ संस्थेच्या वरिष्ठांना माहिती देत महिला तक्रार निवारण समिती व विद्यार्थी सुरक्षा समितीसमोर हा प्रकार मांडला. समिती गठित करून सर्व विद्यार्थिनींची पुन्हा खातरजमा करण्यात आली. संस्थेने आरोपी शिक्षकाला खुलासा करण्यास सांगितले. 12 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता तो कुटुंबासह व्यवस्थापनासमोर हजर झाला. मात्र, यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी प्रकरण आपसात मिटवण्याची मागणी करत त्याच्या कृत्याची पाठराखण केली.
advertisement
विद्यार्थिनींच्या पालकांनी तडजोड नाकारत शाळेनेच पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी केली. त्यानुसार मुख्याध्यापिकांनी मंगळवारी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे रात्री खाजी मुजिबोद्दीन विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 2:08 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
‘तुम्ही माझ्या मुलीसारख्या..,’ जवळ यायचा अन् नको ते करायचा, संभाजीनगरात शिक्षकाचं धक्कादायक कांड









