हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकून दिलं, रुग्णालयात उपचार सुरू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२३) सायंकाळी घडला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.२३) सायंकाळी घडला आहे. अज्ञात कारमधून आलेल्या ४ ते ५ आरोपींनी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण केलं आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे. यादरम्यान मारहाण झाल्यामुळे हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या मालकीच्या हॉटेल भाग्यश्री समोर उभे होते. त्यावेळी तिथे एक चारचाकी गाडी आली. गाडीतील लोकांनी नागेश मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने जवळ जात त्यांनी मडके यांना गाडीत ओढलं.
advertisement
जीवे मारण्याचा कट
गाडीमध्ये असणाऱ्या पाच जणांनी मडके यांना गाडीमध्ये जबर मारहाण केली असल्याचा आरोप मडके यांनी केला आहे. हॉटेलकडून ही गाडी धाराशिवकडे नेण्यात आली. अपहरणकर्त्यांनी मडके यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता, असा आरोपही नागेश मडके यांनी केला.
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावर रुग्णालयात उपचार सुरू
पाच जणांच्या या टोळीने मडके यांना जबर मारहाण करून वडगाव (सि.) येथील पूलावर फेकून दिले. मडके यांनी त्यांच्या कुटुंबियांना फोन करून सदर घटना सांगितल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे नागेश मडके यांनी सांगितले.
advertisement
मागील महिन्यात हॉटेल भाग्यश्रीवर हल्ला करून काही अज्ञातांनी तेथील पोस्टर फाडून टाकले होते. तसेच मागील आठवड्यात हॉटेलवर हाणामारी देखील झाली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेल्या या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी होत आहे. काही महिन्यापासून चर्चेत आलेल्या या हॉटेलमध्ये सध्या बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील हॉटेलच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यामुळे या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
July 24, 2025 7:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं 5 जणांकडून अपहरण, बेदम मारहाण करून पुलावर फेकून दिलं, रुग्णालयात उपचार सुरू


