नगरमध्ये गोळीबाराचा थरार, अल्पवयीन मुलाने 2 भावांवर झाडल्या गोळ्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर याठिकाणी गोळीबाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने दोन भावांवर गोळीबार केला आहे.
श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर याठिकाणी गोळीबाराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलाने दोन भावांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक भाव जखमी झाला आहे, तर दुसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे. गुरुवारी भर दिवसा हा गोळीबाराचा थरार घडला आहे. या गोळाबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना श्रीरामपूर शहरातील भैरवनाथनगर परिसरात घडली आहे. इथं एका अल्पवयीन मुलाने दोन भावांवर दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी एका भावाच्या पायाला लागली, तर दुसरी गोळी हुकवण्यास दुसऱ्या भावाला यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचं कुटुंब भैरवनाथनगर परिसरात वास्तव्याला आहे. याच भागात पीडित तरुणाची आत्याही राहते. आत्याने या भागात स्वत:च्या घराचं बांधकाम सुरू केलं आहे.
advertisement
घटनेच्या दिवशी हे दोन्ही भाऊ आपल्या आत्याच्या घराची देखरेख करण्यासाठी साईटवर आले होते. गुरुवारी दुपारी अल्पवयीन आरोपी त्याठिकाणी आला, तिथे त्याने एका भावाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याने एका भावाच्या दिशेनं गोळीबार केला. पहिली गोळी एका भावाच्या पायाला लागली. यावेळी दुसरा भाऊ घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. तेव्हा अल्पवयीन मुलाने पळून जाणाऱ्या भावाच्या दिशेनं दुसरी गोळी झाडली.
advertisement
सुदैवाने ही गोळी दुसऱ्या भावाला लागली नाही. गोळीबाराच्या या घटनेनंतर गोळीबारातून बचावलेल्या भावाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
March 07, 2025 7:13 AM IST