Holi-Dhulivandana 2026: होळी-धूलिवंदन का साजरं करायचं? ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी शास्त्रीय कारणांसह सांगितलं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Holi-Dhulivandana 2026: यावर्षी सोमवारी 2 मार्च 2026 रोजी सायं. 5 वाजून 56 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे. या दिवशी प्रदोषकाळात पौर्णिमा आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवार 3 मार्च रोजी सायं. 5.08 पर्यंत पौर्णिमा आहे. परंतु मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणजे ग्रहणातच चंद्र उगवणार आहे.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये होळी-धूलिवंदनचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यात वेगवेगळ्या पद्धती-परंपरा उत्सवा दरम्यान पाळल्या जातात. मराठी पंचागानुसार या सणाचे महत्त्व, सण का साजरा केला जातो, याविषयी सविस्तर माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली आहे. शिशीर ऋतूमध्ये अनेक वृक्षांची पानगळ होत असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने पानांचा कचरा निर्माण झाल्याने अस्वच्छता होऊन रोगराई पसरते. त्यामुळे मुले आजारी पडण्याची शक्यता असते. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची पद्धत पूर्वी पडली असावी. परिसराची स्वच्छता केली की अस्वच्छतेची 'ढुंढा' राक्षसीण मुलांना आजारी पाडीत नाही, म्हणून फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनाची धार्मिक प्रथा सुरू झाली असावी. तसेच याच सुमारास सूर्याने सायन मीन राशीत प्रवेश केला की वसंत ऋतूचे आगमन होते. यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी सूर्याने सायन मीन राशीत प्रवेश केल्याने वसंत ऋतूचा प्रारंभ झाला आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद रंग उधळून, गुलाल उधळून व्यक्त करण्यात येत असतो.
यावर्षी सोमवारी 2 मार्च 2026 रोजी सायं. 5 वाजून 56 मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे. या दिवशी प्रदोषकाळात पौर्णिमा आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवार 3 मार्च रोजी सायं. 5.08 पर्यंत पौर्णिमा आहे. परंतु मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. म्हणजे ग्रहणातच चंद्र उगवणार आहे. त्या दिवशी ग्रहणकाळ आणि प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा समाप्त होत आहे. “ इदं चंद्रग्रहणसत्वे वेधमध्ये कार्य ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पूर्णिमासत्वे ग्रहणमध्य एव कार्यम्। अन्यथा पूर्वदिने। “ धर्मसिंधूतील या वचनाप्रमाणे होळी पेटवणे सोमवारी 2 मार्च 2026 रोजी प्रदोषकाळी, भद्रा असतानाही करावे. धूलिवंदन मंगळवार 3 मार्च रोजी करावे. ग्रहणाचे वेध सुरू असतानाही धूलिवंदन करता येते. रंगोत्सव साजरा करता येतो.
advertisement
फाल्गुन महिन्यात येणारा महत्त्वाचा सण म्हणजे होलिकोत्सव! उत्तर भारतात या सणाला दोलायात्रा किंवा होरी म्हणतात तर दक्षिण भारतात हा सण कामदहन म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात मात्र हा सण शिमगा किंवा होळी या नावाने प्रसिद्ध आहे. कोकण-गोमंतकात शिग्मा किंवा शिग्मो असे म्हणतात. शिमगा किंवा शिग्मा या शब्दाचा उगम सांगताना श्री. रा. चि. ढेरे म्हणतात— “ देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘ सुगिम्हअ ‘ म्हणजे ‘ सुग्रीष्मक ‘ असे नाव दिले आहे. या नावापासूनच कोकण-गोमंतकातील मराठीत ‘ शिग्मा ‘ हा शब्द रूढ झाला. त्यापासूनच पुढे या सणाला शिमगा हे नाव रूढ झाले.
advertisement
कथा होलिकेसंबंधीच्या...
हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळालेला होता. हिरण्यकश्यपूने होलिकेस सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावे म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. त्याप्रमाणे तिने केले परंतु प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी होळी पेटवली जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते.
advertisement
भगवान कृष्ण लहान असताना, त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठवले. पण दूध पीत असताना तिचा प्राण शोषून कृष्णाने दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. या पूतना राक्षसीला होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी जाळण्यात येते.
महाराष्ट्रात एक वेगळीच कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन, ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला की ढुंढा राक्षसीण गावातील मुलांना त्रास देत नाही असा समज आहे.
advertisement
दक्षिण भारतात आणखी एक कथा सांगितली जाते. एकदा भगवान शंकर कठोर तपश्चर्या करीत होते. तेव्हा देवांनी मदनाद्वारे त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित झाले. त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि मदनाला भस्मसात केले.
advertisement
संस्कृत साहित्यात वसंतोत्सवाची पुष्कळ वर्णने केलेली आढळतात. वसंतोत्सवात वनविहार, जलक्रीडा, नृत्य, संगीत, नाटक इत्यादी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जात. सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करीत. पिवळा रंग परस्परांच्या अंगावर उडवीत. स्त्रिया झुल्यावर बसून झोके घेऊन वसंत ऋतूविषयक गाणी म्हणत. अशा आनंदमय उत्सवात शृंगाराला बहर येणे साहजिक असे. फाल्गुन मासातील या वसंतोत्सवाला ‘ फाग ‘ म्हणतात. या दिवसात गाणे बजावणे आणि रंगगुलाल उधळणे यांना फारच बहर येतो.
advertisement
महाराष्ट्रात होळी पेटवण्याच्या दिवशी प्रदोषकाळात मधोमध आंबा किंवा एरंड झाडाची फांदी पुरली जाते. तिच्या सभोवताली गवत, पालापाचोळा, गोवऱ्या, लाकडे घालून त्याची होळी केली जाते. अगोदर तिची पूजा करतात नंतर प्रज्वलित केली जाते. प्रज्वलित केलेली होलिका दुधाने विझवतात. नारळ, महाळुंगे यांचा प्रसाद अर्पण करतात. ती रात्र नृत्य गायन करून जागवतात. काही ठिकाणी घरात त्रास देणाऱ्या जीवकीटकांच्या कणिकेच्या आकृत्या करून त्या प्रज्वलित केलेल्या होळीत टाकण्याची प्रथा आहे.
धूलिवंदन
दुसऱ्या दिवशी धूलिवंदन करावयाचे असते. याला ‘धुळवड‘ असेही म्हणतात. या दिवशी आणि रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावण्याची प्रथा आहे. मात्र रंग लावताना ते रंग रासायनिक नाहीत ना याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण रासायनिक रंग हे त्वचेला आणि डोळ्यांना घातक असतात. म्हणून नैसर्गिक रंग वापरावेत, जांभळे, बीट, हळद, पालक यांपासून केलेले नैसर्गिक रंग तयार करता येतात. पाण्याचा वापरही जपून करावा. अपरिचित लोकांवर रंग उडवू नये. रंगोत्सव हा आनंदासाठी करावयाचा असतो. स्वतःला आनंद होताना इतरांनाही आनंद मिळायला हवा आहे. वसंत ऋतू आगमनाप्रीत्यर्थ हा प्रेमाचा, आनंदाचा उत्सव असतो.
होलिकेच्या विभूतीस नमस्कार करून पुढील प्रार्थना म्हणतात.
“ वंदिताऽसि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ “
( हे होलिकेदेवी, तुला ब्रह्मा, विष्णू व शंकरांनी वंदन केले आहे. म्हणून तू आमचे रक्षण कर आणि सर्व भूत- प्राणी मात्रांचे कल्याण कर. ऐश्वर्य दे. )
असा मंत्र म्हणून झाल्यावर —-
“ होलिकादेहसंभूतं सर्वभीतिविनाशनं ।
मदीयदेहजान् रोगान् भस्म नाशाय नाशय ॥ ”
असा मंत्र म्हणून ते भस्म अंगाला लावतात. पुरुषोत्तम गोविंद या देवतेला हिंदोळ्यावर बसवून झोका देतात. नंतर अभ्यंगस्नान करून चंदनाच्या गंधात आंब्याचा मोहर घालून ते मिश्रण पितात. होलिकोत्सवानंतर टिपऱ्यांचा खेळ किंवा खेळे घरोघरी नेण्याची प्रथा कोकणात आहे.
गोव्यातील होलिकोत्सव !
गोव्यातील होलिकोत्सवाचे सुरेख वर्णन पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी केलेले आहे. ते म्हणतात - “ शिमगा म्हणजे पालथा हात तोंडाला लावणे, शिमगा म्हणजे बीभत्स, अर्वाच्य बोलणे हे समीकरण आम्हा गोमंतकवासियांना मान्य नाही. आमचा शिमगा गातो, नाचतो, वाजतो आणि खेळतो. आमची होळी जळत नाही तर ती उभी राहते. गावोगावच्या ग्रामदेवतेच्या देवळासमोर ती उभी केली जाते. त्यासाठी काही दिवस आधीच एखादा सडेतोड पण बेताचा वृक्ष हेरून ठेवला जातो. होळीच्या रात्री गावकरी ढोलकी वाजवीत त्या वृक्षाकडे जातात. त्याची पूजा करून तो तोडतात, त्याच्या फांद्या छाटतात. नंतर तो पंधरा वीस हात उंचीचा उभाच्या उभा गावकरी लोक खांद्यावर घेऊन नाचवीत देवळाकडे येतात. तिथे खोल खड्डा तयार केलेला असतो. त्यात तो वृक्षाचा सोट उभा करतात. त्याला आपादमस्तक आम्रपल्लवांनी सुशोभित करतात. त्याच्या टोकावर एक असोला नारळ ठेवतात आणि त्याच्या शेजारी एक कागदी झेंडा अडकवतात. मग होळीला हळद कुंकू वाहतात, नारळ फोडतात आणि जी काय बोंबाबोंब करायची ती सर्व त्यावेळी करतात. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी मनातील षडरिपू बाहेर टाकले जातात आणि भावनांचा निचरा केला जातो.
बंगाल- ओडिसामध्ये दोलोत्सव
बंगालमध्ये फाल्गुन शुक्ल चतुर्दशीपासून दोलायात्रा उत्सवाला प्रारंभ होतो. त्या दिवशी घरचा यजमान उपवास करून सकाळी कृष्णाची आणि सायंकाळी अग्नीची पूजा करतो. पूजा संपन्न झाल्यावर कृष्णमूर्तीवर फल्गू म्हणजे गुलाल उधळून, जमलेल्या लोकांवरही तो उधळतात. नंतर घराबाहेर एक मोठी गवताची मनुष्याकृती करून तिचे दहन करतात.. हीच त्यांची होळी असते. पौर्णिमेच्या दिवशी कृष्णमूर्ती झोपाळ्यावर किंवा पाळण्यात ठेवून तिला झोके देतात. यालाच दोलोत्सव म्हणतात.
ओडिसामध्येही दोलोत्सव साजरा केला जातो. तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णमूर्तीची पालखीतून घरोघर मिरवणूक नेतात. ज्या घरी ती मिरवणूक जाते त्या घरी कृष्णमूर्तीला अत्तर लावून तिच्यावर गुलाल उधळतात. नंतर मिरवणुकीत सामील झालेल्या लोकांवरही गुलाल उधळतात. तसेच त्यांना वस्त्रे व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान केला जातो. काही ठिकाणी कृष्णवेशात एका माणसाला उभा करून त्याच्याभोवती टिपऱ्यांचा नाच करतात.
“ होळी जळाली, थंडी पळाली “ आणि “ होळी रे होळी, पुरणाची पोळी ! “ अशी वाक्ये इतर होळीगीतांबरोबर आपणास या सुमारास ऐकू येतात. थंडीचे दिवस संपत आलेले असतात. वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते. रंगोत्सव हा आनंदोत्सव होत असतो. शालिवाहन शकवर्ष संपत आलेले असते. होळीच्या सणाला घरोघरी पुरणपोळीचा बेत असतो. या थंडीच्या दिवसात पुरणपोळी आरोग्यदायी असते. पुरणपोळीवर तूप घालून हा सण साजरा केला जातो. वर्ष अखेरीचा हा गोड सण वसंत ऋतूबरोबर नवीन शालिवाहन शक वर्ष येणार असल्याची बातमी देऊन जातो.
सणांमागचा मूळ उद्देश माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य चांगले राहणे, पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे. उत्सवांचा मूळ उद्देश सर्वांनी एकत्र येणे, दुःख- चिंता विसरून स्वतः आनंदित होणे आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हा आहे. माणसाने माणसांशी माणसांसारखे वागणे ही सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे. सण-उत्सव साजरे करताना त्यामागचा मूळ उद्देश आपण लक्षात घेणे जरूरीचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 9:58 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Holi-Dhulivandana 2026: होळी-धूलिवंदन का साजरं करायचं? ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी शास्त्रीय कारणांसह सांगितलं







