280 लोक, 7 दिवस 24 तास नोटा मोजून थकले, आत्तापर्यंत 354 कोटी रुपये जप्त, एवढा पैसा तुम्ही एकाच वेळी कधीच पाहिला नसेल
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
Odisha I-T Raid: मोजणी मशीन अन् कर्मचारी थकले पण पैसे काही संपेनात; खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेत आढळला खजिना
नवी दिल्ली : आयकर विभागाने ओडिशातील डिस्टिलरी कंपनीवर टाकलेल्या छाप्याची कारवाई सोमवारी सहाव्या दिवशीही सुरू राहणार आहे. पाच दिवसांच्या मोजणीनंतर एकूण 351 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही तपास संस्थेला एकाच कारवाईत आढळलेली ही सर्वोच्च रक्कम आहे. या कारवाईचे काही फोटो न्यूज 18च्या हाती आली आहेत. फरशी आणि लॉकर्स रोख पैशांनी गच्च भरल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे.
आयकर विभागाची कारवाई सुरू असलेल्या या मालमत्ता काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरजकुमार साहू यांच्याशी संबंधित आहेत. जप्त केलेल्या चलनी नोटांच्या मोजणीला गती देण्यासाठी अतिरिक्त मशीन, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ही मोजणी अजूनही संपलेली नाही.
करचोरी आणि 'ऑफ-द-बुक' व्यवहारांच्या आरोपाखाली आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाने 6 डिसेंबर रोजी बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, तिचे प्रमोटर्स आणि इतरांविरुद्ध तपास सुरू केला. सुरू असलेल्या कारवाईबाबत पीटीआयने विचारलेल्या प्रश्नांची आत्तापर्यंत कंपनीने तसेच काँग्रेस खासदार साहू यांनी उत्तरं दिलेली नाहीत.
advertisement
रविवारी, ओडिशातील एसबीआयचे प्रादेशिक व्यवस्थापक भगत बेहेरा म्हणाले, "आम्हाला एकूण 176 बॅग मिळाल्या आहेत. त्यापैकी 140 बॅगांमधील पैशांची मोजणी झाली असून, शिल्लक राहिलेल्यांची आज मोजणी होईल. मोजणी प्रक्रियेत तीन बँकांचे अधिकारी आणि आमचे 50 अधिकारी सहभागी आहेत. पैसे मोजण्यासाठी सुमारे 40 मशीन आणण्यात आली आहेत. त्यापैकी 25 वापरात आहेत आणि 15 बॅकअप म्हणून ठेवल्या आहेत."
advertisement
राजकीय नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
काँग्रेस नेत्याच्या मालमत्तेत बेहिशेबी रोकड जप्त झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे या प्रकरणी जाब विचारला आहे. यासंबंधी राज्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, कोट्यवधी रुपये वसूल झाले आहेत. पण, संपूर्ण इंडिया आघाडी या भ्रष्टाचारावर गप्प आहे.
एएनआयशी बोलताना शाह म्हणाले, "मला तर धक्का बसला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका खासदाराच्या घरातून एवढी मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये आढळले आहेत. पण, या भ्रष्टाचारावर संपूर्ण इंडिया आघाडी गप्प आहे. काँग्रेस गप्प आहे हे मी समजू शकतो कारण भ्रष्टाचार त्यांच्या स्वभावात आहे. पण, संयुक्त जनता दल, आरजेडी, डीएमके आणि सपा सगळेच गप्प बसले आहेत. आता मला समजलं की, पीएम मोदींच्या विरोधात एजन्सींचा गैरवापर करत असल्याचा आरोप करणारी मोहीम का चालवली गेली. आपल्या भ्रष्टाचाराची सर्व गुपितं उघड होतील की काय अशी भीती विरोधकांच्या मनात निर्माण झाल्याने ही मोहीम चालवली गेली."
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. शुक्रवारी त्यांनी Xवर पोस्ट केली की, "देशवासीयांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे बघावं आणि नंतर त्यांच्या नेत्यांची प्रामाणिक 'भाषणं' ऐकावीत.... जनतेकडून लुटलेला एक-एक पैसा परत करावा लागेल, हा मोदींचा शब्द आहे."
शनिवारी भाजपच्या झारखंड युनिटने दावा केला की "राज्यात आणि शेजारच्या ओडिशा राज्यामध्ये काँग्रेस नेते साहूंच्या असलेल्या विविध मालमत्तांच्या आवारात छापे मारून जी 300 कोटींहून अधिक रोख सापडली आहे ती राजकारणातील घोडे-बाजार आणि रिसॉर्ट राजकारणासाठी होती. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा आरोप केला आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने 6 डिसेंबरपासून बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध छापे टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये सापडलेल्या चलनी नोटांची मोजणी करण्यासाठी सुमारे 40 मोठी आणि लहान मशीन तैनात आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाचे आणि बँकेचे अधिक कर्मचारी बोलवण्यात आले आहेत. रकमेचं प्रमाण पाहता ती मोजण्यासाठी आणखी वेळही लागू शकतो असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
advertisement
सूत्रांनी असंही सांगितलं की, पश्चिम ओडिशातील सर्वात मोठ्या देशी दारू उत्पादकांपैकी एक असलेल्या बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित भागधारकांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि परिसरांवर छापे टाकले आहेत. आता एजन्सी या गटाशी संबंधित सर्व व्यक्तींची कार्यालयं आणि निवासस्थानांना लक्ष्य करत आहे.
आयकर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रोख रक्कम भरलेल्या 156 बॅग जप्त केल्या आणि मोजणीसाठी बोलंगीर येथील एसबीआयच्या मुख्य शाखेत नेल्या. संबलपूर, रूरकेला, बोलंगीर, सुंदरगड आणि भुवनेश्वर येथे छापे टाकण्यात आले आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
December 11, 2023 3:23 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
280 लोक, 7 दिवस 24 तास नोटा मोजून थकले, आत्तापर्यंत 354 कोटी रुपये जप्त, एवढा पैसा तुम्ही एकाच वेळी कधीच पाहिला नसेल