Haldwani Violence : सगळं ठरलेलं होतं, हल्द्वानी हिंसाचाराची मोठी बातमी, पोलिसांनी केला नवीन दावा
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
‘हल्द्वानी येथील हिंसाचारामागे एक मोठा कट आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत.
हल्द्वानी : उत्तराखंडमधील हल्द्वानी इथे बेकायदेशीर मशीद-मदरशावर स्थानिक प्रशासनाने चालवलेल्या बुलडोझर चालवल्यामुळे हिंसाचार उसळला आहे. हल्द्वानीमधील बनभूलपुरा परिसरात गुरुवारी नगर पालिकेकडून जेसीबी लावून बेकायदेशीर मशीद आणि मदरसा पाडण्यात आला. त्यानंतर हिंसाचार उसळला आणि त्याने बघताबघता दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शहराला सध्या छावणीचं रुप आलं असून, कर्फ्यू लावण्यात आला आहे. या घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कित्येक जण जखमी झाले आहेत. आता प्रशासनाकडून या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. या खुलाशातून या सगळ्या प्रकरणामागे एक मोठा पूर्वनियोजित कट असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा कट असल्याचं सिद्ध करणारे काही पुरावेही प्रशासनाकडून समोर ठेवण्यात आले आहेत.
नैनीतालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी या बाबत माहिती दिली आहे. सिंह म्हणाल्या, ‘प्रशासनाकडून या मदरशाला आधीच अतिक्रमणविरोधी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा मशीद-मदरसा या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर दगड नव्हते. अतिक्रमण हटवल्यानंतर अर्ध्याच तासात हिंसाचाराला सुरुवात झाली. हिंसाचारावेळी अचानकच इतके दगड तिथे कुठून आले? हिंसाचार सुरू झाल्यावर आजूबाजूच्या घरांतून पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक झाली, जणू दगडांचा पाऊसच पडला.’
advertisement
‘हल्द्वानी येथील हिंसाचारामागे एक मोठा कट आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाया करण्यात आल्या आहेत. सगळ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर सुनावणीसाठी वेळही देण्यात आला. काहींनी हायकोर्टात धाव घेतली. काहींना मुदत देण्यात आली तर काहींना मात्र मुदत नाकारण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये मुदतवाढ नाकारण्यात आली तिथे पीडब्ल्यूडी आणि नगर पालिका यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. मशीद-मदरसा यांबाबत काही वेगळी प्रक्रिया नव्हती आणि कोणत्याही मालमत्तेला विशेष लक्ष्यही करण्यात आलेलं नव्हतं,’ असंही वंदना सिंह यांनी स्पष्ट केलं.
advertisement
या कारवाईनंतर झालेला हिंसाचार ही घटना हा पूर्वनियोजित कट असल्याचे काही पुरावे प्रशासनाकडून सादर करण्यात आले आहेत. कारवाईनंतर अर्ध्या तासाने आग लावली गेली. मशिदी शेजारच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात दगड गोळा करून ठेवण्यात आले होते. पोलीस स्थानकात उभ्या गाड्यांना आग लावण्यात आली. संतप्त जमावाने पेट्रोल बॅाम्बने पोलीस स्थानकावर हल्ला केला. पोलिसांना जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न या दंगलखोरांनी केला. बाजूच्या घरांच्या छतांवर दगड गोळा करून ठेवेलेले होते. या निरीक्षणांवरून हा हिंसाचर कट असल्याचं सिद्ध होत असल्याचं प्रशासनाने सांगितलं.
advertisement
हल्द्वानीमध्ये गुरुवारी झालेल्या या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी आहेत. अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बनभूलपुरा क्षेत्रात हिंसेनंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कर्फ्यू लावण्यात आला. तसेच दंगल भडकवणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
Location :
Haldwani Talli,Nainital,Uttarakhand
First Published :
February 09, 2024 7:10 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Haldwani Violence : सगळं ठरलेलं होतं, हल्द्वानी हिंसाचाराची मोठी बातमी, पोलिसांनी केला नवीन दावा