घरासाठी 9 लाख भरले, पण पदरात पडली फक्त निराशा, ठाण्यात महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
स्वतःचे घर असावे, या स्वप्नासाठी अनेक कुटुंबे आयुष्याची कमाई खर्च करतात. मात्र काही वेळा विकासकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा फसवणुकीमुळे घर खरेदीदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
ठाणे : स्वतःचे घर असावे, या स्वप्नासाठी अनेक कुटुंबे आयुष्याची कमाई खर्च करतात. मात्र काही वेळा विकासकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा फसवणुकीमुळे घर खरेदीदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ठाण्यातील टिटवाळा परिसरातही असाच एक प्रकार समोर आला असून अंधेरीतील एका महिलेने घरासाठी पैसे भरूनही चार वर्षे उलटली तरी घराची नोंदणी न करून दिल्याचा आरोप करत विकासक आणि मध्यस्थाविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नाहिद अंजुम वसीम शेख असे तक्रारदार महिलेचे नाव असून त्या मुंबईतील अंधेरीच्या मरोळ परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. काही वर्षांपूर्वी शेख कुटुंब नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात होते. त्यावेळी वसीम शेख यांचे मित्र प्रशांत शिरसाठ यांनी अंबरनाथ येथील विकासक विवेक श्रीवास्तव यांचा टिटवाळा परिसरातील गृहप्रकल्प त्यांना दाखवला.
advertisement
नेमका प्रकार काय?
टिटवाळा परिसरातील आंबिवली गाळेगाव येथे लॅपोमोडे नावाने सुरू असलेल्या या प्रकल्पात शेख कुटुंबाने दोन बीएचके सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या घराची किंमत सुमारे 36 लाख रुपये होती. घराची नोंदणी करण्यासाठी शेख कुटुंबाने विकासकाच्या खात्यात 9 लाख रुपये धनादेशाद्वारे जमा केले.
या रकमेपैकी 5 लाख रुपयांच्या पावत्या विकासकाने दिल्या, मात्र उर्वरित 4 लाख रुपयांच्या पावत्या मध्यस्थ पंकज शिरसाठ यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्या पावत्या वारंवार मागूनही मिळाल्या नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
advertisement
विकासकाने या इमारतीचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर घराची नोंदणी करून दिली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या वेळेनंतरही घराची नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेकडून गृहकर्ज घेणेही शक्य होत नसल्याचे शेख यांनी सांगितले.
प्रकल्पाबाबत धक्कादायक बाबी
दरम्यान या प्रकल्पाबाबत अधिक माहिती काढल्यानंतर काही गंभीर बाबी शेख कुटुंबाच्या लक्षात आल्या.
advertisement
संबंधित गृहप्रकल्प महारेरा (MahaRERA) कडे नोंदणीकृत नसल्याचे आढळले.
कागदपत्रांमध्ये आणि स्वाक्षऱ्यांमध्ये काही तफावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
गाळेगाव येथील प्रकल्पाचे बांधकाम सध्या रखडलेल्या अवस्थेत असल्याचेही दिसून आले.
पैसे परत मागितल्यावर वाद
घराची नोंदणी होत नसल्यामुळे शेख कुटुंबाने विकासकाकडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. उलट विकासकाने शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच मध्यस्थाकडूनही पावत्या देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
या सर्व प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर नाहिद शेख यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी विकासक आणि मध्यस्थाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 8:14 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
घरासाठी 9 लाख भरले, पण पदरात पडली फक्त निराशा, ठाण्यात महिलेची फसवणूक, नेमकं काय घडलं?







