सिनेप्रेमींनो, सुट्ट्यांचे बेत आखून ठेवा! 'मयसभा' ते 'गोंधळ'... मुंबईत रंगणार आशियाई चित्रपटांचा महामोळावा; कुठे पाहाल?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Asian film festival: तब्बल ५० हून अधिक देशांतील जागतिक दर्जाचे सिनेमे पाहण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
मुंबई: तुम्हालाही वेगवेगळ्या आशयाचे सिनेमे पाहण्याची क्रेझ असेल, तर पुढच्या काही दिवसांत तुमची पावलं प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीकडे नक्कीच वळतील. चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला २२ वा 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सव येत्या ९ जानेवारीपासून मुंबईत मोठ्या थाटात सुरू होत आहे. तब्बल ५० हून अधिक देशांतील जागतिक दर्जाचे सिनेमे पाहण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
महोत्सवाचं उद्घाटन अत्यंत दिमाखदार असणार आहे. 'सान चित्रपट महोत्सवात' समीक्षकांची वाहवा मिळवलेला इंडोनेशियन चित्रपट ‘ऑन यूअर लॅप’ याने या सोहळ्याची पडदा उघडणी होणार आहे. जागतिक सिनेसृष्टीतील बदलत्या प्रवाहांची झलक या महोत्सवात पाहायला मिळेल, हे तर नक्कीच!
मराठी दिग्दर्शकांचा आंतरराष्ट्रीय मंचावर डंका
यंदाच्या महोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे राही अनिल बर्वे. 'तुंबाड' फेम राही यांचा बहुप्रतीक्षित हिंदी सिनेमा ‘मयसभा’ पाहण्यासाठी सिनेरसिक आधीच उत्सुक आहेत. त्यासोबतच, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा अलीकडेच गाजलेला ‘उत्तर’, दिग्दर्शक संतोष डावखर यांचा आशयघन ‘गोंधळ’ हे सिनेमे या महोत्सवाची रंगत वाढवणार आहेत. मराठी प्रतिभेला आंतरराष्ट्रीय मंचावर मिळणारे हे स्थान कौतुकास्पद आहे.
advertisement
दिग्गजांचा गौरव: सई परांजपे यांना सन्मान
महोत्सवात केवळ सिनेमेच नसून, ज्यांनी भारतीय सिनेसृष्टीला समृद्ध केलं अशा व्यक्तींचा गौरवही होणार आहे. पद्मभूषण सई परांजपे यांना यंदाचा 'आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार' प्रदान केला जाईल. उमा दा कुन्हा यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्काराने' सन्मानित करण्यात येईल. मिनाक्षी शेड्डे चित्रपट लेखनातील योगदानासाठी त्यांना दिवंगत सुधीर नांदगावकर स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे.
advertisement
कधी, कुठे आणि कसं जायचं?
हा ९ दिवसांचा महोत्सव ९ जानेवारीपासून सुरू होईल. चित्रपटांचे खेळ मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (मिनी थिएटर) आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस येथे पार पडणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 7:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सिनेप्रेमींनो, सुट्ट्यांचे बेत आखून ठेवा! 'मयसभा' ते 'गोंधळ'... मुंबईत रंगणार आशियाई चित्रपटांचा महामोळावा; कुठे पाहाल?






