Prasad Jawade: 'पारू' फेम प्रसाद जवादेवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वांत जवळच्या व्यक्तीने अर्ध्यावरच सोडली साथ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prasad Jawade Mother Death: गेल्या अनेक महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रसादच्या आईचे, प्रज्ञा जवादे यांचे २८ डिसेंबर रोजी निधन झाले.
मुंबई: २०२५ हे वर्ष निरोप घ्यायला अवघे काही दिवस उरले असतानाच, मराठी कलाविश्वातून एक अतिशय चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. 'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'पारू' मधील मुख्य अभिनेता प्रसाद जवादे याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या प्रसादच्या आईचे, प्रज्ञा जवादे यांचे २८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. या दु:खद बातमीनंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुख हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. तिने आपल्या सासूबाईंचा फोटो शेअर करत लिहिले, "१५ सप्टेंबर १९६० - २८ डिसेंबर २०२५... अत्यंत जड अंतःकरणाने कळवत आहोत की मम्मीने आज जगाचा निरोप घेतला. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी मोठ्या धैर्याने लढा दिला. त्या केवळ सासू नव्हत्या, तर कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा धागा होत्या. मम्मी, तुमची आठवण नेहमीच येईल!"
advertisement
मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आजारी आईची धडपड
काही महिन्यांपूर्वी झालेल्या 'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्राने प्रसाद आणि त्याच्या आईमधील अतुट नातं पाहिलं होतं. अत्यंत आजारी असतानाही केवळ मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी त्यांनी व्हीलचेअरवरून हजेरी लावली होती. त्या दिवशी प्रसादला 'उत्कृष्ट मुलगा' हा पुरस्कार मिळाला, तेव्हा तिथल्या प्रत्येक कलाकाराचे डोळे पाणावले होते.
advertisement

त्या सोहळ्यात अमृताने सांगितलं होतं की, प्रसाद कशा पद्धतीने शूटिंग आणि हॉस्पिटल या दोन्ही जबाबदाऱ्या पेलत आहे. स्वतःच्या आईची तो त्यांच्या वडिलांप्रमाणे काळजी घेतो. आईनेही अभिमानाने सांगितलं होतं की, "हॉस्पिटलमध्ये स्टाफ प्रसादला 'आधुनिक श्रावण बाळ' म्हणतात." आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तिला रोज टीव्हीवर दिसावं म्हणून त्याने 'पारू' मालिका स्वीकारली होती.
advertisement
advertisement
गेल्या वर्षी झालं होतं कॅन्सरचं निदान
गेल्या वर्षीच्या दिवाळीत प्रज्ञा जवादे यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून प्रसाद आणि त्यांचं कुटुंब या संकटाशी लढत होतं. शूटिंगच्या धावपळीतही प्रसादने आईची साथ कधीच सोडली नाही. आईच्या प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये तो स्वतः हजर असायचा. आईने मुलाचा यथोचित सन्मान पाहिला आणि आता सुखात निरोप घेतला, अशी भावना त्याचे जवळचे मित्र व्यक्त करत आहेत.
advertisement
प्रसादने स्वतः अद्याप कोणतीही पोस्ट केलेली नाही, पण या कठीण काळात अमृता आणि त्याचे असंख्य चाहते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आई हेच त्याचं सर्वस्व होतं आणि आता त्याच आईच्या निधनामुळे प्रसादवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 11:28 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prasad Jawade: 'पारू' फेम प्रसाद जवादेवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वांत जवळच्या व्यक्तीने अर्ध्यावरच सोडली साथ










