झिंग झिंग झिंगाट! आर्ची आणि परशा पुन्हा मोठ्या पडद्यावर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sairat Rereleased : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेमात इतिहास रचला. या सिनेमातील जोडी म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मुंबई : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'ने मराठी सिनेमात इतिहास रचला. 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गाजला. यातील प्रेमकहाणी आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला. अजय-अतुल यांचे संगीतही या यशात महत्त्वाचे ठरले. 10 वर्षांनी आर्ची आणि परशा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्ची आणि परशाची क्रेझ पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा सगळे झिंगाट होणार आहेत.
'सैराट' पुन्हा येतोय!
'सैराट' पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा सैराट हा चित्रपट 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होत आहे. 'सैराट'च्या चाहत्यांना आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेचा जादू पुन्हा अनुभवता येणार आहे.
advertisement
'सैराट' टीम उत्सुक
चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, 'आम्ही चित्रपट बनवताना एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. आम्ही प्रामाणिकपणे काम केले आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. 'सैराट' पुन्हा प्रदर्शित होत आहे याचा आनंद आहे. यासाठी मी झी स्टुडिओजचे आभार मानतो.'
रिंकू राजगुरू सांगते, “सैराट हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘ सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन.”
advertisement

5 मराठी सिनेमांनींही तोडले कमाईचे रेकॉर्ड, तुम्ही पाहिलेत का?
आकाश ठोसर म्हणतो, "सैराट हा माझ्या करिअरचा पहिला आणि आजवरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परश्या या व्यक्तिरेखेने मला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख दिली. सैराटच्या माध्यमातून आमच्या टीमने जे यश मिळवले, ते आजही आठवणीत आहे. सैराटचे पुनर्प्रदर्शन होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे, की प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाला तितक्याच प्रेमाने स्वीकारतील."
advertisement
संगीत अजूनही लोकप्रिय
संगीतकार अजय-अतुल म्हणतात, “'सैराट'मधील गाणी आजही लोकप्रिय आहेत. चित्रपटाच्या कथेमुळे आम्हाला गाणी करताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. तीच ऊर्जा घेऊन चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत आहे. आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांचा पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळेल.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 10, 2025 1:02 PM IST