KDMC Election Results : राडा झाला, रक्त सांडलं... डोंबिवलीत भाजप-शिवसेनेचे 5 कार्यकर्ते जखमी झाले तिथे लागला धक्कादायक निकाल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
कल्याण-डोंबिवलीमध्ये सगळ्यात वादग्रस्त ठरलेल्या प्रभाग क्रमांक 29 चा निकाल समोर आला आहे. या मतदारसंघामध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते, ज्यात 5 जण गंभीर जखमी झाले.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये सगळ्यात वादग्रस्त ठरलेल्या प्रभाग क्रमांक 29 चा निकाल समोर आला आहे. या प्रभागामधल्या सर्व 4 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, अलका म्हात्रे आणि मंदार टावरे यांनी विजय मिळवला आहे. तर नितीन पाटील, रवी पाटील, रंजना पाटील आणि रुपाली म्हात्रे यांचा पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 29 मध्ये पराभव झाला असला तरी इव्हीएम मशिनमध्ये घोळ असून प्रत्येक उमेदवाराचा आकडा सेम असल्याचा आरोप पराभूत उमेदवार रवी पटाली आणि नितीन पाटील यांच्या पत्नी तसंच उमेदवार रुपाली आणि रंजना पाटील यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपचे 4 उमेदवार निवडून आले आहेत.
डोंबिवलीमधल्या वॉर्ड क्रमांक 29 मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली होती, पण प्रचाराच्या वेळी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले, ज्याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं.
advertisement
काय होता वाद?
डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत होती, पण प्रचारावेळी 13 जानेवारीला दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मागच्या दोन दिवसांपासून भाजप पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा आरोप शिवसेना उमेदवाराकडून केला गेला. यानंतर शिवेसना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि यातून तुफान राडा झाला, या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूंचे 5 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. यानंतर पोलिसांनी शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गंभीर जखमी झालेल्या कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 1:41 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Election Results : राडा झाला, रक्त सांडलं... डोंबिवलीत भाजप-शिवसेनेचे 5 कार्यकर्ते जखमी झाले तिथे लागला धक्कादायक निकाल!










