मेमू आता घाट उतरणार! इगतपुरी ते कसारा जोडणीसाठी रेल्वेच्या हालचाली; पहा काय आहे नवा मार्ग
Last Updated:
Bhusawal–Igatpuri MEMU Train : भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे कसारापर्यंत वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईसाठी थेट, परवडणारी आणि सोयीची रेल्वे मिळू शकणार आहे.
कसारा : भुसावळ ते इगतपुरी दरम्यान धावणाऱ्या मेमू रेल्वे गाडीचा विस्तार थेट कसारापर्यंत करण्यात यावा अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सध्या भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना अनेक टप्प्यांत प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
प्रवाशांचा टप्प्याटप्प्याचा प्रवास होणार का बंद?
भुसावळ-मुंबई दरम्यान लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या असल्या तरी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना त्यामध्ये अनेकदा जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवासी भुसावळ-इगतपुरी मेमूने इगतपुरीपर्यंत जातात. त्यानंतर कसारा गाठण्यासाठी दुसरी रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. कसाऱ्याहून पुढे मुंबईसाठी लोकल रेल्वेने प्रवास केला जातो.
या टप्प्याटप्प्याच्या प्रवासामुळे गाड्या बदलताना अडचणी निर्माण होतात. अनेक वेळा वेळेचे नियोजन बिघडते आणि खर्चही वाढतो. जर भुसावळहून सुटणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत चालवण्यात आली तर भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईसाठी परवडणारी आणि अनारक्षित रेल्वे मिळू शकते.
advertisement
ही मेमू सेवा विशेषत विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यापारी आणि प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे लोकल रेल्वेची चांगली सोय उपलब्ध असल्याने प्रवास अधिक सुलभ होईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक वेगवान होईल असा विश्वास प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 8:09 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
मेमू आता घाट उतरणार! इगतपुरी ते कसारा जोडणीसाठी रेल्वेच्या हालचाली; पहा काय आहे नवा मार्ग









